पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१६]
भाग दुसरा.


रूपसौंदर्य जरी अलौकिक नव्हते, तरी नाकाडोळ्यांनी ती सुरेख असून बालपणापासून तिच्या मुखावर एक प्रकार राजतेज पाहणारास दिसत असे. तिच्या बाललीला पाहून तिच्या आईबापास तिला कोठे ठेवू आणि कोठे न ठेवू असे झाले होते. त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे पिंपळपान, हासळी, हातांतली बिंदली वगैरे दागिने तिला केले होते व ज्योतिष्याच्या सांगण्यावर त्यांचा पुरा विश्वास होता ह्मणून, ही राजकुळांतच उत्पन्न व्हावयाची असून ज्यापेक्षा आपल्या पूर्वपुण्याईने आपल्या घरी अवतीर्ण झाली आहे, त्यापेक्षां इला किंचितही दुःख देणे ह्मणजे तिचा अपराध करणे होय, अशी त्यांची दृढ समजूत होऊन त्यांनी तिचे लालनपालन करण्यांत आपणाकडून कधी कमी पडू दिले नाही.

 अहल्येला पांचवें वर्ष लागल्यापासून, तिच्या ठायीं, पुढे ज्या लोकोत्तर सद्गुणांनी तिची दिगंत कीर्ति झाली त्यांचे अंकुर थोडथोडे दिसावयास लागले. आपल्या समवयस्क शेजारच्या मैत्रिणींजवळ ती मोठ्या प्रेमान वागत असे, व तिला कोणी काही पदार्थ खाण्याकरितां दिल्यास ती त्यांतील काही भाग त्यांना दिल्याशिवाय कधीं खात नसे; तसेंच कधीं कांहीं खेळ खेळणे झाल्यास तिच्या आवडीचा मोठा खेळ ह्मणजे एकादा धोंडा मांडून त्याला देव समजून त्याची पूजा करणे हा होता. याशिवाय इतक्या लहान वयांत असतां देखील तिची सत्यावर अत्यंत प्रीति असे. ती कधी कोणाशी खोटें बोलत नसे व तिच्याशी कोणी खोटे बोलल्यास त्याच्याशी मुळी भाषण करीत नसे.

 अहल्येच्या अंगी असलेल्या अशा अनेक सद्गुणांमुळे