पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जन्म आणि बाळपण.

[१५]


होणार असें मानून गर्भातून त्याची निर्विघ्नपणे सुटका व्हावी ह्मणून त्या दोघांनी अनेक देवांस अनेक नवस केले व शेवटी त्यांच्या मनोदयाप्रमाणे ते सर्व सफल होऊन नवमास पूर्ण होतांच आनंदरावाची पत्नी प्रसूत होऊन तिला मुलगी झाली.

 रविवंशमुकुटमणि राजा दिलीपाने व त्याच्या स्त्रीने नंदिनीची सेवा करून अपत्यप्राप्ति करून घेतली, तेव्हां त्या दंपत्यास जसा परमावधीचा हर्ष झाला तसाच या आमच्या आनंदरावास व त्याच्या बायकोस अनेक नवसांनी व जगदंबेच्या सेवासायासांनी झालेल्या कन्यालाभामुळे झाला. त्याने लागलेंच त्या वेळी नगरास कोणी नामांकित ज्योतिषी होता, त्याला आणवून त्याकडून आपल्या मुलीचे टिपण करविलें. ज्योतिष्याने त्यास सांगितले, 'तुझ्या मुलीचे ग्रह इतके उत्तम आहेत की, ती एका मोठ्या संस्थानिकाच्या घरांत पडून पुढे त्याच्या राज्याची स्वामिणी होईल, आणि आपल्या सद्वर्तनाने व औदार्याने या भरतखंडांत आजपर्यंत कोणी मिळविली नाही अशी कीर्ति संपादन करील.' ज्योतिष्याचे हे भाषण ऐकून आनंदरावास परमानंद झाला व त्याची योग्य संभावना करून त्याने त्यास परत घरी जाण्यास निरोप दिला. नंतर बारा दिवस होत तोपर्यंत जे काय विधि करावे लागतात ते सर्व करून बारावे दिवशी मोठ्या थाटाने मुलीचे बारसे केले, व तिचें नांव अहल्या असें ठेविलें. ही गोष्ट इसवी सन १७३५ या वर्षी घडली.

 अहल्या वर्षाची आल्यानंतर चांगली बोलूं चालू लागली; तिचे