पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४]
भाग दुसरा.


तसेंच आतां करावयाचे. कारण, मलाही नुकतेच असे स्वप्न पडले की, जिने आपल्या कडेवर एक तान्हुली मुलगी घेतली आहे अशी एक सुवासिनी मजपाशी आली व माझ्या कपाळी कुंकू लावून त्या मुलीला ओटीत घालून एकाएकी अदृश्य झाली. मला हे स्वप्न पडतें न पडतें तोंच तुम्हांला असें पडून तुह्मी मला हांक मारिली, यावरून जगदंबा खचित आतां आपणांवर लवकरच कृपा करणार; तर उद्या आपली सेवा पूर्ण झाली ह्मणून चार ब्राह्मणसुवासिनींना जेवावयाला घालून लागलेच येथून निघण्याचें करूं.

 यानंतर स्त्रीच्या इच्छेनुरूप आनंदरावाने आपल्या ऐपतीप्रमाणे दुसरे दिवशी ब्राम्हणभोजन घातले; सुवासिनींच्या खणानारळांनी ओट्या भरल्या व जे अनाथ, आंधळे, पांगळे होते त्यांची शिधा देऊन योग्य संभावना केली; मग त्या योगाने आपणांस कृतकृत्य मानून घेणाऱ्या त्या दंपत्याने दुसरे दिवशी कोल्हापूर सोडून आपल्या गांवाचा रस्ता धरिला. थोडेच दिवसांत ती उभयतां पाथरडीस स्वतःच्या घरी येऊन पोचल्यावर सेवा पूर्ण झाली ह्मणून त्यांनी तेथल्या आपल्या सर्व आप्त, इष्ट मंडळीसही आपल्या घरी भोजनाचा लाभ देऊन संतुष्ट केले.

 सकल लोकांची चिंता हरण करणारी जी कोल्हापूरची जगदंबा तिची सेवा कधी तरी निष्फळ होईल काय ? तिच्या प्रसादाने पुढे लवकरच आनंदरावाच्या स्त्रीस गर्भ राहिला. मग आनंदरावाच्या व तिच्या आनंदास काय विचारावें ! केवळ जगदंबेच्या कृपेनें म्हातारपणी आपणांस हा अपत्यलाभ