पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जन्म आणि बाळपण.

[१३]


शिध्याशिवाय अधिक प्राप्ति नव्हती; पण श्रीमंताकडून दरमहा आठ दहा रुपये त्याला मिळत त्यावर तो आपला चरितार्थ चालवून आनंदाने रहात असे. या पंतोजीचा व आनंदरावाचा अत्यंत स्नेह जमलेला असल्यामुळे त्याचा कोल्हापुरास देवीची सेवा करण्याकरितां जाण्याचा निश्चय झाल्यावर या आपल्या मित्रास आपण परत येईपर्यंत घरची व शेताची व्यवस्था नीट रीतीने करावयास सांगून त्याने सुमुहूर्तावर भार्येसह कोल्हापुरास प्रयाण केले.

 आनंदराव आणि त्याची पत्नी या दंपत्याने कोल्हापुरास एक वर्षपर्यंत राहून जगदंबेची सेवा केली त्या योगाने ती प्रसन्न होऊन एके दिवशी आनंदराव निद्रिस्थ असतां पहाटेच्या वेळी स्वप्नांत प्रकट होऊन त्याला ह्मणाली की, तूं आज वर्षभर दृढभक्तीने केलेल्या माझ्या सेवेने मी संतुष्ट झाले आहे, तर आतां तूं आपल्या घरी जा. तुझा जो इच्छित हेतु आहे तो मीच तुझ्या उदरीं येऊन पूर्ण करीन. इतकें बोलून जगदंबा अदृश्य झाली.

 हे विलक्षण पण आनंददायक स्वप्न पडल्यावर आनंदराव जागा झाला व हर्षातिशयाने वेडा होत्साता लागलीच बायकोला हाक मारून व तिला सर्व स्वप्नवृत्तांत कथन करून ह्मणाला की, आतां आपला मनोदय खचित सफल होणार; यावर आपणांस सेवा करण्याचे काही कारण राहिले नाही. मातुश्रीच्या आज्ञेप्रमाणे आतां आपण घरी जाऊं.

 त्याचे हे भाषण ऐकून त्याची स्त्री ह्मणाली, 'आपण ह्मणतां