पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२]
जन्म आणि बाळपण.


सांगण्याप्रमाणे पतीसह काही दिवस कोल्हापुरास जाऊन जगदंबेची सेवा करावयाची असा तिने दृढ निश्चय केला व पतीसाठी ती पुनः स्वयंपाक करण्यास लागली. काही वेळाने आनंदराव शेताहून परत आल्यावर जेवावयास बसला असतां तिने त्यास गोसाव्याच्यासंबंधाने झालेली सर्व हकीकत सांगितली. व त्याने दिलेला जगदंबेचा अंगारा त्यास देऊन कोल्हापुरी जाण्याचा झालेला आपला दृढ निश्चय त्यास कळविला. आनंदराव आपल्या स्त्रीप्रमाणेच जात्या मोठा भाविक असल्यामुळे व अपत्यप्राप्तीविषयी त्याचीही उत्कंठा अनिवार झाली असल्यामुळे तत्काळ तिच्या हेतूस त्याचे अनुमोदन मिळाले. मग उद्यांच कोल्हापुरास जावे असा त्या दोघांनी बेत केला.

 पाथरडी गांवांत एक लहानशी शाळा होती असे मागे सांगण्यांत आलेच आहे. ती आनंदरावाच्या घरासमोरच एक मारुतीचे देऊळ होते त्यांत असून दहा पंधरा मराठ्यांची मुलें तेथें नेहमी उजळणी शिकत असत. त्यांना शिकविणारा पंतोजी किंचित् उतार वयाचा असून उजळणी, साधारण बाळबोध मोडी वाचणे व तोंडाने बिनचूक हिशोब करणे, यापलीकडे त्याच्या विद्येची मजल गेली नव्हती; आणि तेथील मुलांना बरेच दिवसांपासून त्याचीच तो संथा देत असे व त्या वेळी याहून अधिक शिकण्याची जरूरही नव्हती. हा पंतोजी जातीचा ब्राह्मण असून विद्वान या संज्ञेस जरी किंचित्ही पात्र नव्हता, तरी तो मोठा पापभीरु, स्वकर्मनिष्ठ व ईश्वरभक्तिपरायण असल्यामुळे त्या गांवांतील सर्व लोकांवर त्याचे चांगलें वजन असे. शाळेंत सणांनिमित्त मिळणाऱ्या