पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग दुसरा.

[११]


मोठ्या आदराने त्यास बसावयास पाट देऊन भोजनास वाढिलें; आणि तेणेकरून तो संतुष्ट झाल्याने आपणास धन्य मानिले.

 इतर बैरागी, गोसावी, केवळ पोटाकरितां त्या वेषाचा अंगिकार करून गांवोगांव भटकत फिरतात त्याप्रमाणे तो नसून खरोखरच मोठा साधु होता. भोजन करून तृप्त झाल्यावर त्याने बाईची सर्व हकीकत विचारून घेतली, तेव्हां मातारपण होण्याचे दिवस आले तरी अद्यापि अपत्यलाभ न झाल्यामुळे ती उभयतां फार दुःखी आहेत असे त्यास कळून आले. नंतर काहींसा विचार करून झोळीतून थोडासा अंगारा काढून तो तिच्या हातावर ठेवून तिला ह्मणाला, माई, " ही गोष्ट होणे न होणे केवळ परमेश्वराधीन आहे, तरी आपणाकडून तत्प्राप्तीसाठी होईल तितका प्रयत्न करण्यांत कधी अंतर पडू देऊ नये. आतां मी सांगतो तें नीट लक्ष देऊन ऐक. मी आज बारा वर्षे हिंडून सर्व हिंदुस्थानांतील तीर्थे पाहिली त्यांत कोल्हापूरचे जगदंबेचें स्थान मोठे जागृत आहे असे मला समजून आले. व तुला आतां प्रसाद ह्मणून जो अंगारा दिला तो तिचाच आहे; तर हा उभयतां तुह्मी आपल्या कपाळी लावा. व काही दिवस कोल्हापुरास जाऊन जगदंबेची सेवा करा, ह्मणजे ती प्रसन्न होऊन खचित तुमचा मनोरथ सफल करील." असें ह्मणून 'शंकरजी तुझा हेतु पूर्ण करो' असा आशिर्वाद देऊन तो निघून गेला.

 गोसाव्याने आपणास जो प्रसाद दिला तो परमेश्वरानेच दिला असे समजून व तीच शकुनाची गांठ बांधून त्याच्या