पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०]
जन्म आणि बाळपण.


पूर्ण झाले नाही. ती जरी अडाणी जातीची होती तरी प्रपंचाविषयी मोठी शहाणी, स्वधर्मावर श्रद्धा ठेवणारी व पतीच्या आज्ञेत सदा तत्पर राहणारी असे; यामुळे आनंदरावाची तिजवर अत्यंत प्रीति असून तिनें कांहीं हट्ट घेतल्यास तो पूर्ण केल्यावांचून त्याच्याने राहवत नसे.

 असे सांगतात की, एके दिवशी आनंदराव कांहीं कामाकरितां आपल्या शेती गेला होता. दुपारची जेवणाची वेळ टळून गेली तरी तो आला नाही, ह्मणून ती माउली घराच्या पडवीत सारखे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती; इतक्यांत, ज्याने लंगोटी नेसून सर्वांगास राख फांसली आहे. गळ्यांत पुष्कळशा रुद्राक्षांच्या माळा घातल्या आहेत, काखेत भिक्षेची झोळी लोंबत आहे व ज्याच्या मस्तकाच्या ठायीं लांबलांब जटा आहेत; ज्याला तिचे दैव उघडून मनोरथ पूर्ण होण्याचा समय आला ह्मणून तिजवर अनुग्रह करण्याकरितांच केवळ परमेश्वराने पाठविले आहे, असा कोणी गोसावी अकस्मात् तिजसमोर प्राप्त होऊन , " जय शंकर, माई, दोनप्रहर झाल्यामुळे भुकेनें माझे प्राण व्याकुळ झाले आहेत, यासाठी भोजनास घालशील तर शंकर तुझे सर्व मनोरथ पूर्ण करील, असें तिला ह्मणाला. त्या साध्वीचा स्वभाव जात्या परोपकारी असल्यामुळे जरी तिचा पति जेवावयाचा होता व त्याचीच ती वाट पहात बसली होती, तरी ऐन दुपारी क्षुधेनें पीडित झालेला अतिथि विन्मुख परत लावणे तिला फार अवघड वाटून तिने त्याला केवळ परमेश्वर समजून पतीसाठी जो स्वयंपाक तयार केला होता तोच त्याच्या कारणी लावावयाचा विचार केला, व