पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेवटचे भयंकर दुःख.

[१५७ ]


  बाईसाहेबांच्या मरणाने ज्यांस दुःख झाले नाही असा त्यावेळी साऱ्या हिंदुस्थानांत एकदेखील प्राणी नव्हता. त्यांचे आवडते प्रजाजन, त्यांचे यजमान श्रीमंत पेशवे व त्यांच्याशी स्नेहभावाने वागणारे सर्व राजेरजवाडे यांस त्यांच्या वियोगाने जें अपरिमित दुःख झाले त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. आह्मी एवढेच ह्मणतों की, त्या वेळी आम्हाला सोडून बाईसाहेब गेल्या नाहीत; तर भूतदया, पातिव्रत्य, प्रजावात्सल्य, इत्यादि सद्गुणांची देवताच या आमच्या हतभाग्य लोकांतून नाहींशी झाली! पण त्याबद्दल शोक करून व कपाळावर हात मारून आपण किती वेळ जरी कष्टी होऊन बसलों तरी त्याचा काय उपयोग होणार ? या मृत्युलोकचा जो प्राणी एकदा गेला तो परत येत नाही. परमेश्वराच्या कृपेनें व आपल्या भाग्याने जितका त्याचा लाभ आपणास घडला तितक्यांतच समाधान मानून पुढे त्याच्या कृपेनें तसा प्राणी कधी उत्पन्न होतो याकडे डोळे लावून बसावें हेच आपणास योग्य आहे. मानवी आयुष्याचा विचार केला तरी, बाईसाहेबांचा जो त्यांच्या साठाव्या वर्षी काल झाला तो जरी अगदी अकाली नव्हता तरी योग्यकाली झाला असेंही ह्मणतां येत नाही. अशा उदारशील साध्वीस परमेश्वराने आणखी वीसपंचवीस वर्षे या जगांत ठेविले असते तरी काही सृष्टिनियमाविरुद्ध झाले असते असे नाही. पण या निरर्थक विचाराचा आतां काय उपयोग? एकपक्षी बाईसाहेबांसारख्या पुण्यशील स्त्रीस आयुष्याची साठ वर्षे मिळाली ही तरी परमेश्वराने मोठीच कृपा केली असें ह्मणावे लागते. कारण या आर्यभूमीवर पहिल्यापासूनच त्याची इतकी अवकृपा होऊन राहिली आहे