पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १५६ ]
भाग पंधरावा.


उपासतापास त्या करीत असल्यामुळे त्याची शक्ति अत्यंत क्षीण झाली होती. दुसरा कोणी असतां तर खरोखरच अशास्थितीत तो अगदी अंथरूण धरून राहता व आपल्या परिजनांवर संतापून ईश्वराच्या नावाने हाका मारता; पण धन्य त्या साध्वीची ! अशा वेळीही तीने आपल्या मनाची चलबिचल होऊ न देतां परमेश्वराकडे लय लावून त्याच्या नामस्मरणांत आपले अंतकाळचे दिवस घालविले. तिच्या जबर पुण्याईमुळे अशा परतंत्रस्थितीत तिला एक आठवड्यापेक्षा अधिक काळ कंठावा लागला नाही. शेवटीं सन १७९५ ह्मणजे शके १७१७ यावर्षी श्रावण वद्य चतुर्दशीस सावधान मनानें प्रभूचे नामस्मरण करीत असतां या आमच्या पुण्यशील चरित्र नायकेच्या धार्मिक आयुष्याची समाप्ति झाली. त्याच दिवशी प्रातःकाळी तिच्या परमप्रीतीतली एक धेनु होती तिने मोठ्याने हंबरडा फोडून प्राण सोडिला. अंतकाळी देखील या साध्वीने बारा हजार ब्राह्मणांस भोजन घालण्याचा संकल्प करून आपली उदारबुद्धि जागृत ठेविली होती.

 अहल्याबाईसाहेबांचे देहावसान झाले तेव्हां तुकोजी होळकर त्यांच्या जवळ नव्हता ह्मणून त्याचा धाकटा भाऊ संताजी होळकर याने मोठ्या समारंभाने त्यांचे उत्तरकार्य केले. त्यांचे प्रेत स्मशानांत नेते वेळी त्यांच्या ठिकाणी मातेप्रमाणे प्रेम ठेवणारे त्यांचे लक्षावधि प्रजाजन त्यांस समारंभाने पोंचविण्यास गेले होते. त्यांच्या प्रेतास अग्निसंकार करतेवेळी त्या सर्वानी त्यांच्या मंगल नामाचा मोठ्याने गजर केला व ' अहल्याबाईसाहेबांस त्यांच्या पुण्यकर्माबद्दल निरंतर आपल्या चरणापाशी ठेव ' अशी करुणस्वराने परमेश्वराची प्रार्थना केली.