पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंतकाल आणि उपसंहार.

[१६५ ]


बांच्या मनांतील हेतु सर्व जनसंपर्क सोडून आपण केवळ ईश्वरार्चनांत काळ घालवावा असा असल्यामुळे त्यांनी आपल्या धर्मकृत्यांची व्यवस्था ब्राह्मणांच्या गळ्यांत घालून त्या विरक्त होत्सात्या एकांतांत बसल्या होत्या, पण ज्या सर्व लोकांचा त्यांचे ठायीं ईश्वराप्रमाणे भाव होऊन राहिला होता ते त्यांस कसे चैन पडू देणार ? बाईसाहेबांचे दर्शन करून देण्याविषयी ते त्यांच्या जवळ असणाऱ्या सेवकजनांचा सारखा पिच्छा पुरवीत; तेव्हां निरुपायास्तव दिवसांतून एक वेळ बाहेर येऊन आपल्या दर्शनाने सर्वांस संतोषित करणे त्यांस भाग पडे. ही लोकांची इच्छा जशी बाईसाहेबांनी तृप्त केली त्याप्रमाणेच त्यांच्या भेटीकरितां जे राजेरजवाडे येत त्यांची भेट न घेतली तर त्यांचा आपण अपमान केल्यासारखा होऊन त्यांस दुःख होईल असा विचार करून त्या त्यांचीही भेट घेऊन घटकाभर त्यांच्याशी संभाषण करीत व ते तेथें असत तोपर्यंत त्यांचा मानमरातब आपले लोक कसा ठेवितात याची चौकशी करीत.

 अहल्याबाईसाहेबांचा हा नित्य क्रम सुमारे चार महिने पर्यंत सुरळीतपणे चालला. पुढे त्यांच्या अंगांतली सर्व शक्ति नष्ट होऊन त्यांच्या इंद्रियांवर त्यांचा अंमल चालेनासा झाला. आणि असे झाले यांत नवल तरी कसले ? बाईसाहेब किती जरी पुण्यशील असल्या तरी त्यांचे शरीर मानवीच होते, तेव्हां अशा पंचभौतिक देहावर दुःखाचे अनेक आघात झाले तर त्यांच्यापुढे त्याचा किती दिवस टिकाव लागणार ? तशांतन राज्यकारभारासारख्या अतिशय दगदगीच्या कामांत त्यांच्या आयुष्याचा बराच भाग गेला असल्यामुळे व अनेक व्रतवैकल्ये व