पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १५२ ]
भाग चौदावा.


पाहण्यास त्या फार दिवस या जगांत राहिल्याच नाहीत. पण त्यांच्या वृद्धापकाळी या दुःखाचा त्यांच्या हृदयांत जो विलक्षण धक्का बसला तो आमरण कायम होता. यानंतर त्यांच्या मुखावर आनंद ह्मणून कधी दृष्टीस पडलाच नाही, व कोणतेही ऐहिक कृत्य करण्यास त्यांस उत्साह वाटला नाही. म्हातारपणी त्या दुःसह दुःखाने त्यांची अशी स्थीति झाली हे योग्यच आहे; पण त्यांनी केवळ मातेप्रमाणे आपल्या प्रजेचें न्यायाने व प्रेमाने पालन करून अपरिमित औदार्य दाखविले असतां व अनेक ठिकाणी चिरकालिक सत्कृत्ये करून महत्पुण्य संपादन केले असतां शेवटी त्यांचा असा दुष्परिणाम झाला हें पाहून ऐहिक धर्मकृत्यांविषयी बेपर्वाई व परमेश्वराविषयी नास्तिकबुद्धि आपल्या मनांत उत्पन्न होण्याचा संभव आहे खरा, पण विचार करून पाहतां असे होणे हे केवळ भ्रांतिमूलक होय. परमेश्वरसत्तेने या जगांत ज्या काही गोष्टी घडून येतात त्यांपासून लोकांस उत्तम शिक्षण प्राप्त व्हावे असा त्याचा हेतु असतो, तसाच आमच्या चरित्रनायिकेवर आलेल्या या प्रसंगाचाही असला पाहिजे. आतां तो अमुकच असेल हे जरी निश्चयाने सांगतां येत नाही, तरी या आपल्या अज्ञानास्तव त्या जगन्नियंत्याविषयींचा आपला पूज्यभाव कमी होऊ देणे हे आपणास अगदी अनुचित होय.


भाग चौदावा समाप्त.