पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४८]
भाग चौदावा.


ल्या मातेजवळ येऊन तिच्या पायां पंडून व मोठ्या प्रेमाने तिच्या गळ्याला मिठी मारून तिजपाशीं सती जाण्याविषयी निरोप मागूं लागली.तिचा त्या वेळचा तो भयंकर वेष पाहतांच बाईसाहेबांची कोणत्या प्रकारची अवस्था झाली ती आम्हांस शब्दांनी सांगता येत नाही. त्यांना आपली कन्या आपणास सोडून चालली याचं अत्यंत दुःख होऊन त्यांनी मोठ्याने किंकाळी फोडिली. मग आपल्या प्रिय कन्येच्या त्या वेळच्या त्या उग्र स्वरूपाकडे पाहून त्या निराशेने ह्मणाल्या, ' मुक्ताबाई, शेवटी तूं माझं ऐकत नाहींसच ना ? मला म्हातारपणी एकटीला दुःखांत टाकून तूं चाललीसचनां?' यावर त्यांच्याने काहीं अधिक बोलवेना ! दुःखातिशयाने त्यांना घेरी आल्यासारखे होऊन त्यांनी डोळे मिटले. आपल्या मातेची त्या वेळची ती दशा पाहून साध्वी मुक्ताबाईलाही तसेच दुःख झाले, तरी आता तें मनांत आणून काही उपयोग नाही असा विचार करून ती तिला मोठ्या गंभीरपणाने ह्मणाली, 'आई, आतां तूं मला कोणताही उपदेश करूं नकोस, त्याचा काही उपयोग होणार नाही. या वेळी माझे सर्व देहभान नाहीसे झाले आहे; व प्राणनाथाकडे जाण्याकरितां मन सारखें आठ घेत आहे; तर आतां मजविषयींची सर्व माया सोड आणि मला निरोप दे. परमेश्वर तुझ्या या प्रेमास्तव तुझी माझी स्वर्गलोकी खचित गांठ घालून देईल, व तेथे आपला कधी वियोग होऊ देणार नाही. आई, तूं आजपर्यंत अनेक दुःखांच्या प्रसंगी आपले धैर्य खचूं दिले नाहीस, तर या वेळी ते सोडून माझ्या व आपल्या पुण्यकीर्तीस कमीपणा आणू नकोस.' हे मुक्ताबाईचे निश्चयाचं भाषण ऐकून तिचा झालेला बेत फिरणे नाही अशी