पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १४६ ]
भाग चौदावा.


लाडकी मुक्ताबाई ही दुर्दैवी निघावीनां ? दुष्टा दुर्दैवा कसेरे तुला हें आवडलें ?" असें ह्मणून कपाळ बडवून घेऊन ती रडूं लागली. बराच वेळपर्यंत तिला समजुतीच्या दोन गोष्टी सांगण्यास तिचे धैर्य झाले नाही. पतीविषयी मोठमोठ्याने आकांत करकरून मुक्ताबाईचे देहभान नाहीसे होऊन गेले होते. कंठ कोरडा पडल्यामुळे त्यांतून एकही शब्द निघत नव्हता; तरी आपली आई आलेली पाहतांच तिच्या गळ्याला मिठी मारून तिने मोठ्याने हंबरडा फोडिला. पण बराच वेळपर्यंत तिच्या मातेने व इतर आप्तांनी तिला दोन विचाराच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तिने एकदम आपलें रखें गिळिलें व जवळच्या लोकांस 'माझी सती जाण्याची तयारी करा' असे ती ह्मणाली.

 सती जाण्याविषयींचे आपल्या मुलीच्या मुखांतले शब्द ऐकतांच अहल्याबाईसाहेबांचे सर्व धैर्य सुटले व त्यांना अनिवार दुःखाने घेरिलें. मग त्या मोठ्या प्रेमबुद्धीने तिला आपल्या पोटाशी धरून व जरासा दुःखाचा वेग आंवरून ह्मणाल्या, 'माझे लाडके, हा काय ग तूं आपला भलताच निश्चय करतेस ? या वेळी असा अविचार करूं नकोस ? माझ्या जिवाला काय तो तुझाच विसावा असून हल्ली मी म्हातारी झाले असतां तूं आपलाच हेका धरून सहगमन करावें हें नीट नाही. जर तुझी माझ्यावर भक्ति असली तर या संसारांत मला एकटी निराश्रित सोडून तूं जाऊं नकोस. जाशील तर तुला देवाचीच शपथ आहे.

 बाईसाहेबांनी असें म्हटल्यावर मुक्ताबाई गहिवरून त्यांस ह्मणाली, आई, तुझें मजवर प्रेम आहे ह्मणून तूं ह्मणतेस