पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेवटचे भयंकर दुःख.

[१४५ ]


टाकिते. दहाबारा वर्षे साध्वी मुक्ताबाई कोठे या सुखाचा आनंद घेते आहे तोच तिच्या मुलाचा अंत झाला, त्यामुळे तिला किती दुःख झाले असेल हे सांगितले पाहिजे काय ? तरी परमेश्वरसत्तेपुढे इलाज नाही ह्मणून व आपल्या मातेने आणि पतीने केलेल्या उपदेशास मान देऊन देवाच्या कृपेनें आणखीही मुलगा होईल अशा आशेवर तिने त्या वेळचें आपलें औदासिन्य नाहींसें केलें व पुनः पतीसह ती आनंदाने राहूं लागली.

 पण ज्या दुर्दैवास मुक्ताबाईच्या सुखाचा सर्वस्वी अपहार करून तिच्या पातिव्रत्याची परीक्षा करावयाची होती व तिच्या धार्मिक मातेच्या दुःखाचा कडेलोट करून सोडावयाचा होता त्याची तिचा इतकाच छल करून तृप्तता झाली नाही. मुलगा गेल्याचे दुःख मुक्ताबाई कांहीसे विसरते आहे तोच त्याने निर्दय काळाग्नीत तिच्या प्रिय पतीची, अथवा मनोरथाचीच कां ह्मणाना, आहुति दिली! मग काय विचारितां आमच्या चरित्र नायिकेस तिच्या निर्मल पातिव्रत्याची परमेश्वराने दिलेली केवळ मूर्तिमत देणगीच अशा त्या मुक्ताबाईची शोकातिशयाने जी स्थिति झाली ती वाचून अंगावर रोमांच उभे राहतात. त्या वेळी तिच्या दुःखास तर सीमा नव्हतीच; पण तिच्या प्रेमळ मातेची तो भयंकर प्रसंग ऐकून इतकी कठिण अवस्था झाली की ती धाडकन् जमीनीवर बेशुद्ध होऊन पडली. तसेच सर्व लोकही अत्यंत शोकाकुल झाले. मग मुक्ताबाई आपल्या शोकानें आकाशपाताळ एक करून जेथे बसली होती तेथे जाऊन व तिची ती हृदयद्रावक अवस्था पाहून ' हाय हाय ! मजप्रमाणेच माझी

   १३