पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १४४ ]
भाग चौदावा.


त्यांच्या जीवाची त्यांची एकुलती एक कन्या मुक्ताबाई हीच होती, व ही महेश्वर येथील यशवंतराव पानसे या नांवाच्या एका जहागीरदाराच्या मुलास दिली होती हेही मागे सांगण्यांत आलेच आहे. लग्न झाल्यावर आपल्या पतीसह मुक्ताबाई आपल्या मातेप्रमाणेच कडकडीत पातिव्रत्य राखून व तिच्या इतर सर्व सद्गुणांचे अनुकरण करून धर्माचरणांत काल घालवीत होती, व अपत्यस्नेहाने आपल्या आईस प्राप्त झालेल्या अनेक दुःखांचा निरंतर विसर पाडीत होती. परमेश्वराच्या कृपेने काही दिवसांनी तिला पुत्रही झाला. मग तिला कसले दुःख असावें बरें ? मनाजोगता पति, भरपूर ऐश्वर्य व पुत्रलाभ या तीन्ही गोष्टी लाभल्यामुळे, यांशिवाय आवश्यक अशी ऐहिक सुखाची गोष्ट कोणतीही नाही ह्मणून त्यांत सदा संतुष्ट राहून पतीच्या आज्ञेत व परमेश्वराच्यासेवेत ती आपले आयुष्य कंठीत होती. तशांत अहल्याबाईसाहेबांचे बहुतेक स्वाभाविक गुण तिच्या अंगांत दिसून येत असल्यामुळे ही बाईसाहेबांस योग्य कन्या परमेश्वराने दिली आहे' अशी लोकांत होत असलेली तिची कीर्ति तिला ऐकावयास मिळत असे. खुद्द बाईसाहेबही तिच्या गुणांची प्रशंसा करून त्या योगाने आपणास धन्य मानून घेत. याप्रमाणे मुक्ताबाई आपणास सर्व सुखे परमेश्वराने दिली आहेत असे समजून सदोदित आनंदाने रहात असल्यास त्यांत नवल कसले ? पण अरेरे ! अशा कुटुंबसुखांतही हे नष्ट दुर्दैव माती कालवून त्या कुटुंबांतील माणसांस हाय हाय करावयास लावण्यास एका पायावर तयार असतें ! देवाचे आणि दैवाचे हाड वैरच आहे की काय न कळे ह्मणून त्याने दिलेली सुखं ते आपल्या प्रभावानें क्षणांत नाहींशी करून