पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग २ रा.


चरित्रनायिकेचें जन्म आणि बालपण.


 जगदीश्वरसंकेताने या मानवकोटीत जी रत्नें पैदा होतात ती ज्याप्रमाणे आपल्या कुलास भूषण आणितात त्याप्रमाणेच आपल्या जन्मभूमीसही जगांत धन्यत्व आणितात; मग ती एकादें संपन्न शहर असो, पवित्र क्षेत्र असो, निर्जन अरण्य असो अथवा जेथील हवापाणी अगदी खराब आहे असे एकादें खेडे असो; त्या मानवरत्नांच्या योगाने तिला पूज्यत्व प्राप्त होऊन इतिहासांत तिचे नांव अजरामर होते. श्रीएकनाथमहाराजांच्या योगानें पैठण, तुकारामबुवांच्या योगाने देहू, बाळाजी विश्वनाथाच्यायोगाने श्रीवर्धन ही त्यांच्या जन्मस्थलांची नांवें इतिहासास शोभा देऊन बसली आहेत. याचप्रकारचे श्रेष्ठत्व आमच्या चरित्रनायिकेच्या जन्माने एका अप्रसिद्ध अशा खेड्यास आले. हे नगरजिल्ह्यांत असून त्याचे नांव पाथरडी आहे.

 सांप्रत याची स्थिति जरी एकाद्या साधारण खेड्यापलीकडे विशेष गेलेली दिसत नाहीं तरी दीडशे पावणेदोनशे वर्षांपूर्वी हल्लीच्याहून बरीच भिन्न होती. गांवासभोवती लांबचलांब अशी हिरव्यागार गवताची कुरणे पसरलेली असून त्यांत गाईंचे कळप यथेच्छ चरतांना दिसत असत. गांवांत जरी बहुतेक मराठ्यांची वस्ती होती तरी आठ दहा ब्राह्मणांची घरे असून श्रीमंत पेशवेसरकारचा एक ठाणेदार नेहमी तेथे