पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १४ वा.


शेवटचे भयंकर दुःख.


 वाचकहो, प्रवास करण्यास अति दुःसह असा पर्जन्यकाल आला असता त्यांतच प्रवास करणे दुर्दैवाने तुह्मांस भाग पडल्यास पावसाच्या सरी मागून सरी तुम्हांस आपल्या अंगावर घेतल्याच पाहिजेत. मग त्यांत घटकाभर आनंददायक सूर्यप्रकाश पडून त्याने तुमच्या चित्तास उल्हास प्राप्त झाल्यास तुमच नशीब. तरी तेवढी घटका लोटल्यावर त्या कालांतील परमेश्वराच्या नियमाप्रमाणे पुनः पावसाची मुसळधार पडून ती तुमचा तो सर्व उल्हास तत्क्षणी लयास नेणार व त्याच्या दुप्पट तुमचं मन उदास करणार. पण निरुपायास्तव तुह्मांस त्याच प्रसंगातून मार्ग क्रमीत गेले पाहिजे. त्याबद्दल तुह्मी किती दुःख केले अथवा त्रासून परमेश्वरास दोष दिला तरी त्याचा काय उपयोग होणार आहे ? तद्वतच हे आमचे अहल्याबाईसाहेबांचे चरित्र ह्मणजे अनेक दुःखरूप पर्जन्याच्या सरीमागून सरींचा वर्षाव करणारा मेघकालच आहे. हे चरित्न वाचीत असतां प्रथम एकसारख्या दुःखांच्या वर्णनाने भरलेले यांतील भाग तुह्मी मोठ्या कष्टानें वाचिले व तेणे करून तुमच्या मनास अत्यंत उदासीनता आली ; पण सुदैवाने त्या मेघकालांतील सूर्यप्रकाशाच्या दर्शनाप्रमाणे त्या दुःखांच्या भागांपुढले