पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[१४१ ]


  बाईसाहेबांच्या अंगी इतके लोकोत्तर गुण असतांही त्यांस किंचितही गर्व नव्हता ही गोष्ट मानवी स्वभावाच्या पलीकडची समजली पाहिजे. केवळ त्यांना स्वतःला गर्व नव्हता इतकंच नाही, तर त्यांच्या गुणाची कोणी स्तुति केली तर ती देखील त्यांस सहन होत नसे. एकदा एका ब्राह्मणानें त्यांच्या विषयी स्तुतिपर ग्रंथ लिहून तो त्यांच्या समोर वाचून दाखविला; तेव्हां तो वाचीत असतां मात्र त्या कांहीं बोलल्या नाहीत; पण तो आटोपल्यावर त्या त्या ब्राह्मणास ह्मणाल्या की, मी एक मृत्युलोकची पापी स्त्री आहे, हे वर्णन मला मुळीच शोभत नाही. तुह्मी ब्राह्मण असून ईश्वरस्तुति सोडून नरस्तुति करावयास लागला हे मोठे आश्चर्य आहे. असें ह्मणून त्यांनी तो आत्मस्तुतिपर ग्रंथ आपल्या हातांनी नर्मदेत टाकून दिला व त्या ब्राह्मणास त्याबद्दल कांहीं न देतां परत जाण्यास सांगितले व फिरून त्याची कधी चौकशी देखील त्यांनी केली नाही. अहल्याबाईसाहेबांच्या या कृत्याबद्दल त्यांची किती तारीफ केली तरी ती थोडीच आहे.

 बाईसाहेबांच्या स्वभावाचे येथे इतकेंच वर्णन करून आम्ही हा भाग संपवितों. आणखी त्याविषयी आम्हांस कांहीं लिहावयाचे आहे ते या चरित्राच्या शेवटी लिहूं.


भाग तेरावा समाप्त.