पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४०]
भाग तेरावा.

करीत असतां तें वर्तमान बाईसाहेबांस कळल्यावरून त्यांनी त्यांस आपल्याजवळ बोलावून आणिलें, आणि त्यांस असा उपदेश केला की, तुम्ही ब्राह्मण असतां तमाशा करितां हे खचित मोठे पातक करीत अहां; यासाठी हा निंद्य धंदा सोडून देऊन दुसऱ्या एकाद्या चांगल्या मार्गात आपल्या विद्वत्तेचा उपयोग करा. बाईसाहेबांचा हा उपदेश लागलाच फंदीबुवांच्या मनांत भरून त्या वेळेपासून त्यांनी तमाशा करणे सोडून दिले व चांगल्या कामी आपल्या बुद्धीचा व्यय करून द्रव्य आणि लौकिक ही दोन्ही संपादन केली.

 बाईसाहेबांस लहानपणी त्यांच्या पंतोजीकडून थोडेबहुत शिक्षण मिळाले होतेच; त्यामुळे तेव्हांपासूनच त्यांस लिहिता वाचतां येत होते. त्याचा उपयोग त्यांचा भ्रतार निवर्तल्यानंतर त्यांस फार झाला. दिवसाचा बराच वेळ त्या प्राकृत पोथ्यापुराणें वाचण्यांत घालवीत व त्यांचा अर्थ त्यांस चांगला कळत असे. पुढे राज्यकारभारांत पडल्यावर अनेक विद्वान् लोकाशी त्यांचा सहवास होत गेल्यामुळे त्यांस बऱ्याच संस्कृत शब्दांची माहिती झाली व तिचा त्यांनी संस्कृतांतली न्यायशास्त्रासंबंधी, राज्यव्यवहारसंबंधी व धर्मशास्त्रसंबंधी पुस्तकें पाहून व स्वतः त्यांवर विचार करून चांगला उपयोग केला. आपल्या राज्यांत एकादा कायदा करणे झाल्यास त्या आपल्या कारभाऱ्यांशी त्यासंबंधाने पुष्कळ वेळां चर्चा करून मग करीत, व त्या वेळी त्यांचें तें ज्ञान पाहून कारभाऱ्यांस मोठे आश्चर्य वाटे. सारांश, त्यांच्या इतकी ज्ञानसंपन्न स्त्री त्याच्या वेळी साऱ्या हिंदुस्थानांत कोणीही नव्हती असें म्हटल्यास आम्ही अतिशयोक्ति करितों असें कोणी ह्मणेल असे आह्मांस वाटत नाही.