पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[१३९ ]


होऊ देण्याविषयी त्यांनी पुष्कळ काळजी घेतली. सर्व देवांच्या ठायीं त्यांचा सारखा भाव असे, व एकाच परमेश्वराच्या या सर्व विभूति आहेत असे समजून सर्वांची त्या नेहमी भक्ति करीत व दर्शन घेत.

 परोपकारार्थ द्रव्य खर्च करणे हे बाईसाहेब जसे आपले कर्तव्य समजत तसेच विद्वान् लोकांस आश्रय देऊन त्यांच्या गुणांचे चीज करणे हेही आपले कर्तव्य समजत. नित्यशः त्यांच्याकडून मोठमोठे वैदिक, पंडित, शास्त्री यांस शालजोड्या, धोतरजोडे व पागोटी मिळत आणि गवई, गोंधळी यांस कंठ्या व कडी बक्षिस मिळत. कधी कधी तर त्या विद्वान् व शास्त्री लोकांस आदरपूर्वक पत्र पाठवून आपल्या भेटीस बोलावीत. प्रसिद्ध विद्वान् कवि मयूरपंडित हे काशीयात्रा करण्यास गेले असता त्यांच्या विद्वत्तेचा लौकिक ऐकून त्यांची भेट घेण्याकरिता बाईसाहेबांनी पालखी पाठवून त्यांस मोठ्या समारंभाने महेश्वरास आणिलें व काही दिवस त्यांस आपल्या संनिध ठेवून घेऊन व त्यांच्या विद्वत्तेप्रमाणे त्यांचा मोठा गौरव करून त्यांस दक्षिणेत रवाना केलें.

 कोणा ही विद्वानाच्या विद्वत्तेविषयीं जसा बाईसाहेब योग्य विचार करीत तसाच त्याच्या व्यावहारिक आचरणाविषयीही करीत व ते चांगले नसल्यास त्यास तें सुधारण्याविषयी उपदेश करीत. प्रसिद्ध रंगेल कवि अनंतफंदी हे लहानपणी मोठे बुद्धिमान् असतांही एका मुसलमान फकिराच्या नादी लागून तमाशा करीत असत. एके वेळी ते महेश्वरास येऊन तमाशा