पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३६ )
भाग तेरावा.


णार नाही. प्रभाकर कवीने स्वतः पाहून त्यांच्या विषयी जें असें म्हटले आहे ते अक्षरशः खरे असले पाहिजे अशी आमची खातरी आहे.

 बाईसाहेबांची औदार्याची सर्व कृत्ये वर्णू लागलो तर ती कधीच संपावयाची नाहीत, ह्मणून येथेच हात आखडता घेऊन त्यांविषयी इतकेंच लिहितों की, या उदारबुद्धीच्या महाराणीने नानाप्रकारच्या धर्मकृत्यांत सुमारे वीस कोटि रुपये खर्चीले आहेत ! आतां हे खरे आहे की, एवढी मोठी संपत्ति स्वराज्यांत राहूंद्या, पण परराज्यांतही देवळे, विहिरी, धर्मशाळा वगैरे बांधण्यांत त्यांनी खर्च केली हे वाचून हल्ली ज्ञानसंपन्न झालेले आमचे वाचक त्यांस दोष देण्यास तयार होतील व अशा फाजील औदार्याने त्यांनी लोकांस आळशी केले असही ह्मणतील. त्याप्रमाणेच पशू वगैरे ग्राम्य प्राण्यांशीही त्यांचे असलेलें अमानुष भूतदयेचे वर्तन पाहून त्यांस हसू येईल. आमच्या वाचकांपैकी ज्यांची अशी समजूत असेल त्यांस, बाईसाहेबांविषयी पूर्वी मालकमसाहेबांची अशाच प्रकारची समजूत होउन त्यांनी या अपरिमित दानधर्मासंबंधाने त्यांस दोष दिला त्या वेळी त्यांच्या पदरच्या एका ब्राह्मणाने साहेब मजकुरांस जे उत्तर दिलें तेंच देतो. तो ब्राह्मण मालकमसाहेबांस ह्मणाला की, बाईसाहेबांनी परकीय राज्यांत इमारती बांधून व अफाट दानधर्म करून आपली सर्व संपत्ति गमाविली असे आपण ह्मणतां, पण या सत्कृत्यांत त्यांनी जो पैसा खर्च केला त्याच्या दुप्पट जरी लष्कराकडे खर्च केला असता तरी त्यांची प्रजा तीस वर्षेपर्यंत शांततेचा उपभोग घेती व आज दानधर्मामुळे जितके