पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[१३३]


राहिले असता त्यांनी त्यांस अन्नवस्त्र पुरवून त्यांचा योग्य समाचार घेतला. खचितच त्या वेळी बाईसाहेबांसारखी उदार व दयार्द्र अंतःकरणाची स्त्री त्या दुष्काळपीडित लोकांचे संरक्षण करण्यास मिळाली नसती तर अन्न अन्न करून त्यांनी आपले प्राण पटापट सोडिले असते !

 अहल्याबाईसाहेब नित्य सहस्र ब्राह्मणांस गोप्रदाने देत असत; तसेच जे गरीब लोक होते त्यांस शिधा व वस्त्रे वाटीत असत. त्यांचेकडे आलेला कोणीही याचक कधी विन्मुख ह्मणून गेलाच नाही. शिवाय अत्यंत नीच जातीचे जे लोक होते त्यांस प्रत्येक सणावाराच्या दिवशी त्यांच्याकडून उत्तम पक्वान्नांची वाढणी मिळत असत. आंधळे, पांगळे, लुले, अशा लोकांचा त्या फार चांगला समाचार घेत. बैरागी, गोसावी, वगैरे लोकांविषयी त्यांच्या अंतःकरणांत पूज्यबुद्धि असून त्यांच्या निर्वाहाची तजवीज त्यांनी चांगली करून दिली होती. उष्णकाळांत त्यांनी ठिकठिकाणी आपले नौकर ठेविले असून ते तृषित झालेल्या वाटसरांस पाणी पाजण्याकरितां तयार असत. त्याचप्रमाणे शीतकाळाच्या आरंभी सर्व जातींच्या गरीब लोकांस वस्त्रे वाटण्याकरितां त्यांच्या पदरचे कारकून फिरत असत. सारांश, त्यांची अशी अनेक तन्हांची औदार्याची कृत्ये पाहून त्या वेळी साक्षात् भूतदयाच अहल्याबाईसाहेबांच्या रूपाने माळव्यांत येऊन राहिली आहे की काय असें पाहणारास वाटत असे.

  तरी एवढ्यानेच या भूतदयेचा कळस झाला असेल असें कोणी समजू नये. सर्व मनुष्ये जशी त्यांच्या औदार्यास

             १२