पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६]
भाग पहिला.


दाराच्या ताब्यांत दिल्लीच्या बादशाहाने दिलेला होता. त्याशी लढाई करून त्यास जिंकण्याचे काम श्रीमंतांनी या वीरास सांगितले असता त्याने मोठ्या पराक्रमाने धन्याच्या आज्ञेप्रमाणे त्या लढाईत विजय संपादन करून दायबहादुरास समरांगणी ठार मारिलें, या त्याच्या लोकोत्तर शौर्याने व साहसाने बाजीरावसाहेबांची त्यावर सुप्रसन्न मर्जी होऊन त्यांनी बक्षीस ह्मणून त्याच माळवाप्रांताची त्यास वंशपरंपरेने सुभेदारी दिली. याप्रमाणे, जो केवळ मेंढ्या राखणारा मल्हारी धनगर होता तो देवाच्या व आपल्या पराक्रमाच्या जोरावर सुभेदार मल्हारराव होळकर व पेशवे सरकारचा शूर आणि एकनिष्ठ सेवक बनला ! दैव ह्मणून ज्यास ह्मणावयाचें तें अशाच विलक्षण प्रकारचे असते !!

 दिवसानुदिवस मल्हाररावाचा सारखा अभ्युदय होत चाललेला पाहून त्याच्या मामास फार आनंद झाला, आणि त्याने गौतमाबाई नांवाची आपली एकुलती एक कन्या त्याला अर्पण करून आपणास धन्य मानले ! ही गौतमाबाई होळकरांच्या घराण्यांत मोठी तेजस्वी आणि धैर्यवान् अशी स्त्री होऊन गेली. आपल्या पतीचा कधी लढाईत पराजय होऊन त्याचा निरुत्साह झाला असतां ती त्यास वारंवार उत्तेजन देऊन पुनः लढाईला पाठवीत असे व त्यास विजय प्राप्त झाल्यावांचून स्वस्थ बसू देत नसे. याशिवाय ती गृहप्रपंचांत मोठी दक्ष असून स्वभावाने किंचित् तापट असे. मल्हाररावाची तिजवर अत्यंत प्रीति होती. प्रथम अगदी गरीब स्थितीत असून पुढे एका मोठ्या संस्थानाचे अधिपतित्व प्राप्त झालेल्या या दंपत्यास एकंदर तीन अपत्ये झालीं-दोन कन्या व एक पुत्र.