पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२२]
भाग अकरावा.


गोष्टींची खचित हेळसांड झाली नसावी. ही कृत्ये करण्यास पुष्कळ काळ लागतो, तितका तिच्या कारकीर्दीत मिळाला नसल्यामुळे ती प्रचारांत आली नाहीत. जरी कांहीं आली असली तरी तिच्यामागून होळकरांच्या राज्यांत बहुत कालपर्यंत झोटिंगपाच्छाईचा अम्मल गाजला गेल्यामुळे ती त्यांत नष्ट झाली असावी असे आह्मांस वाटते. अथवा धर्मकृत्यांत आणि त्रासदायक राज्यकारभारांत तिचे सर्व आयुष्य निघून गेल्यामुळे जरी तिचें या कृत्यांकडे दुर्लक्ष झाले असले तरी त्यामुळे तिच्या राज्यपद्धतीच्या चांगुलपणास यत्किचित्ही दूषण येत नाही. मालकम साहेबांनी तिच्या सर्व राज्यपद्धतीचे वर्णन केल्यावर शेवटी म्हटले आहे 'ऐहिक कृत्ये करतांनां शेवटी ईश्वरास जाब द्यावा लागेल अशी दृढबुद्धि ठेवणे यापासून कसें अनुभवसिद्ध लाभ होतात या गोष्टींचे अहल्याबाई ध्यानात ठेवण्याजोगें उदाहरण आहे. ' आमच्या चरित्रनायिकेविषयी हा परक्याचा अभिप्राय तिजसंबंधाच्या आमच्या लेखाची सबळता वाचकांस दाखवील व तिजविषयीं त्यांच्या मनांत अभिमान उप्तन्न करील अशी आमची खात्री आहे.


भाग अकरावा समाप्त.