पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[१२१ ]


साहेबांच्या मध्यहिंदुस्थानच्या इतिहासांतून आम्ही घेतली आहे. तेव्हां तिजविषयी संशय घेणे नको. राज्यशकट सुयंत्रित हाकण्यास या साध्वीचें मन आणि शरीर ही दोन्ही कशी समर्थ झाली याचे त्या थोर इंग्रज गृहस्थांस प्रथम मोठे आश्चर्य वाटले पण शेवटीं अनेक आधारावरून तिच्या राजकार्यधुरंधरत्वाविषयी त्यांच्या मनाची पूर्ण खातरी झाल्यावर परकीयभाव त्यांच्या मनांतून एकदम नाहीसा होऊन तिचे त्यांस अत्यंत कौतुक वाटले. तिची राज्य चालविण्याची पद्धति ह्मणजे निःपक्षपात न्यायाचे माहेरघरच असे होळकरांच्या सर्व प्रजेनें ठरविले आहे, व डोंगरांत राहाणारे रानटी लोक तिने दिलेले हक्काचा उपभोग घेऊन त्यांत पूर्ण समाधान मानून आहेत. तिच्या कारकीर्दीत तिच्या अधिकारांत असलेल्या प्रातांत कधी दंगाधोपा उद्भवला नाही व रयतेवर अधिकाऱ्यांकडून जुलूम वगैरे झाला नाही ही तिच्या न्यायी कारकीर्दीची उत्तम प्रमाणे होत, व ती राज्य चालवीत असतां तिच्या राज्यांतले सर्व लोक भरभराटीस चढले ही तिच्या लोकोत्तर प्रजावात्सल्याची साक्ष होय. होळकरांच्या प्रजेंत तिचें नांव एकाद्या साधुसंताच्या नावाप्रमाणे पूज्य होऊन बसले आहे याचे कारणही तिची उत्तम राज्यव्यवस्था व धर्मवासना असेंच म्हटले पाहिजे. राज्यांत विद्यावृद्धि करणे व कलाकौशल्यास उत्तेजन देणे ही देशोन्नतीची मुख्य साधनें होत; पण त्याविषयी तिच्या वृत्तांतांत कोठे आधार न मिळाल्यामुळे आम्ही त्याचे वर्णन करण्याच्या भरसि पडून तिची फाजिल प्रशंसा करीत नाही.तरी आमचें मन आमची खात्री करू शकतें की जिनें दानधर्मात व लौकिककृत्यांत कोट्यावधि रुपये खर्च केले तिच्या हातून अशा आवश्यक

   ११