पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११८]
भाग अकरावा.


की तुमच्या संगोपनाखाली माझ्या नवऱ्याने व दिराने मिळविलेली सर्व संपत्ति मी तुह्मांस स्वसंतोषाने देते. तापीदासाच्या बायकोच्या या ह्मणण्यावर तिला बाईसाहेबांनी असे सांगितले की, मला तुझ्या संपत्तीचा काही उपयोग होणार नाही. तुला जर ती नकोशी झाली असेल तर ब्राह्मणांस धर्म कर किंवा तुझ्या नवऱ्याचे नांव मागे राहील असें एकादें स्तुत्य व लोकोपयोगी स्मारक करण्यांत तिचा उपयोग कर. बाईसाहेबांचे हे ह्मणणे तापीदासाच्या बायकोने मान्य केलें व खरगोणच्या नदीस तिने मोठा घांट बांधून त्यावर आपल्या नवऱ्याच्या नांवाने श्रीगणपतीचे अत्यंत सुंदर असें देऊळ बांधिलें. ही दोन्ही कृत्ये तिच्या दौलतीच्या सद्विनियोगाची व अहल्याबाईसाहेबांच्या निरपेक्ष व निर्लोभ बुद्धीची अद्यापि खरगोण येथे साक्ष देत आहेत.

 आपल्या राज्यांत आपल्या धर्मातील प्रजेविषयी बाईसाहेब जशी काळजी घेत असत त्याप्रमाणेच मुसलमान वगैरे परधर्मी लोकांविषयीही घेत असत. परधर्माचा छळ व हेलना करावी असें अगोदर हिंदुधर्मात कोठे सांगितलें नाहींच; पण बाईसाहेब याच्याही पुढे असत. ज्याप्रमाणे हिंदुलोकांस आपल्या चालीरीति पाळण्याची पूर्णपणे मोकळीक असे त्याप्रमाणेच इतर विधर्मी लोकांसही असे, व त्यांच्यावर कोणत्याही बाबतीत केवळ धर्मसंबंधानें कसलीही सक्ती त्यांच्याकडून होत नसे. आपल्या लोकांच्या वहिवाटी व हक्क जसे त्यांनी चालू ठेविले होते तसेच त्यांचेही चालू ठेविले होते, व जे सरकारी कायद्याचे नियम यांस लागू होते तेच त्यांसही लागू केले होते.