पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११६]
भाग अकरावा.


तल्यापासून त्या जातीने खुल्या दरबारांत जात असत व सर्व सरकारी काम मोठ्या आस्थेनें करीत असत. वसुलाचा जमाखर्च व हिशोब ठेवण्यांत केवळ कारभाऱ्यांवर विश्वास न ठेवितां त्या आपण स्वतः तपासून पाहात असत व त्यांत कितीही श्रम झाले तरी त्याकडे दुर्लक्ष करीत नसत. खर्चापेक्षां उत्पन्न अधिक असणे हे चांगलें, ह्मणून ते वाढत्या प्रमाणावर असण्याविषयी त्या फार खबरदारी घेत; तथापि अन्यायाने त्यांतील वाढलेला एक पैसाही त्यांस सहन होत नसे. फार काय सांगावें ? नजरनजराणा घेणे हा काही अन्याय नव्हे असा त्या वेळी सर्व मराठे लोकांचा समज असतांही त्यांनी ती रीत वाईट असे मानले होते. मोठमोठे शेटसावकार व वाणीउदमी लोक आपल्या कामाकरितां बाईसाहेबांकडे अनेक प्रकारचा नजराणा आणीत असत; पण त्याचा त्यांनी कधी देखील स्वीकार केला नाही. हा नियम जसा त्या जातीने पाळीत तसाच आपल्या पदरच्या अमलदारांस पाळण्याविषयीही त्यांची सक्त ताकीद असे. त्या असें ह्मणत की, नजराणा घेण्याची कोणास लालूच लागली ह्मणजे त्याच्या हातून न्यायापेक्षा अन्याय अधिक होण्याचा संभव आहे.

 आपल्या प्रजेच्या मालमत्तेविषयी बाईसाहेब किती निरपेक्ष असत याची चांगली खातरी होण्यासाठी त्यांच्या कारकीदीतल्या एक दोन गोष्टी येथे सांगणे आह्मांस अवश्य वाटते. त्या वेळी सिरोजपरगणा होळकरांच्या अमलाखाली असतांना तेथील खेमदास नांवाचा कोणी कोट्याधीश सावकार मरण पावला. त्याच्या पोटीं संतान नसल्यामुळे त्याची बायको आपल्या पुतण्यास दत्तक घेण्याचा विचार करू लागली; पण त्या प्रांताच्या