पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११४ ]
भाग अकरावा.


तेथे हौद देवळे वगैरे ठिकठिकाणी बांधिली. स्वतः बाईसाहेब जरी नेहमीं महेश्वरास राहात असत तरी या शहरावर व त्यांतील लोकांवर त्यांची अत्यंत कृपा असे. त्यांच्या संपत्तीची भरभराट होत चालली असतां तीपासून आपणास किंचितही अधिक प्राप्ति करून घेण्याची इच्छा न करितां तिचे संरक्षण करण्याविषयी त्या नेमलेल्या अधिकाऱ्याकडून फार खबरदारी घेववीत असत. असे सांगतात की, खंडेराव नांवाचा कोणी ब्राह्मण इंदूर येथे कमाविसदारीचे काम पाहात होता, त्याकडून वेळचेवेळी वसूल गोळा होई हे पाहून बाईसाहेबांस जितका आनंद होई त्यापेक्षा तेथील आपली रय्यत अत्यंत सुखी व समाधानी आहे हे पाहून अधिक आनंद होई. आपल्या राज्यकत्रींचें आपल्यावर असें मातेप्रमाणे निस्सीम प्रेम पाहून इंदूरच्या सर्व लोकांस तिचा मोठा अभिमान वाटत असे व त्यामुळे ते केवळ देवाप्रमाणे तिजवर भक्ति ठेवीत.

 होळकरांच्या राज्यांत खुद्द बाईसाहेबांपाशी थोडीशी शिबंदी फौज मात्र होती; मुख्य फौजेपैकी काही दक्षिणेत तुकोजी होळकराबरोबर व कांही उत्तरहिंदुस्थानांत गुंतलेली असे; तरी तिची व्यवस्था फार चांगल्या प्रकारची ठेविलेली असल्यामुळे आपल्या राज्याचे रक्षण करण्यास ती त्यांस पुरेशी होती. त्यांच्या राज्यांत अन्यायाला मुळीच थारा मिळत नसल्यामुळे कधी दंगेधोपे होत नसत, व आपल्या प्रजेच्या सुखाविषयी त्या फार दक्षपणा ठेवीत असल्यामुळे हाताखालच्या कामगारांस आपल्या प्रांतांतील लोकांवर जुलूम करण्यात मुळीच धीर होत नसे. वेळचे वेळी वसूल गोळा करून ते त्यांजकडे पाठवीत