पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकारभार.

[११३ ]


जा प्रसंग आल्यास त्यावेळी न्याय आणि दया ही दोन्ही अंतःकरणांत जागृत ठेवून व फिर्यादी आणि आरोपी या दोन्ही पक्षांच्या पुराव्याचा योग्य विचार करून अपराध्यास शासन करणे ते करीत. आपण या लोकी जे काही चांगले किंवा वाईट करितो त्याचा परलोकी परमेश्वरापाशी आपणास जाब द्यावा लागेल ही बुद्धि त्यांच्या हृदयांत नेहमी वास करीत असे; यामुळे केवळ अधिकाराच्या जोरावर व केवळ लोकांच्या सांगण्यावर त्यांच्याकडून न्यायाची पायमल्ली कधी झाली नाही. त्यांच्या प्रत्येक निकालांत न्याय आणि दया ही दोन्ही स्पष्ट दिसून येत. त्यांच्या एकंदर सर्व कारकीर्दीत देहांत शिक्षेची उदाहरणे म्हटली तर ती अगदीच थोडी आहेत. ती इतकी की एका हाताच्या बोटाइतकी देखील नाहीत. त्यांच्या हाताखालच्या कामगारांपैकी कोणी त्यांस कोणास फाशीची शिक्षा देण्यास सांगितले असता त्यांस त्या उत्तर देत की बाबांनो, आपणा सर्वांस मरावयाचे आहे, तेव्हां ईश्वराने उत्पन्न केलेल्या प्राण्याचा जीव आपण एकाएकी कसा घ्यावा बरे ?

 हल्ली होळकरांच्या राजधानीचे जे इंदूर शहर आहे ते त्यावेळी अगदी लहान खेडे होते. त्याप्त अहल्याबाईसाहेबांनी मातब्बर व विस्तीर्ण अशा शहराची योग्यता आणिली. श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी पुणे शहराची वसती वाढविण्याकरितां दुसऱ्या शहरांतून व्यापारी व इतर कारागीर लोक आणून त्यांस घरे बांधण्याकरितां मुफत जागा देण्याची प्रथम जशी व्यवस्था केली होती तशीच इंदूरची वसती वाढविण्यासाठी बाईसाहेबांनी केली. या रीतीने तेथे बाजारपेठ व बरीच घरे लोकांनी बांधिल्यावर त्यांनी