पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११२]
भाग अकरावा.


असे. याशिवाय त्या रानटी लोकांस बाईसाहेबांनी काही पडित जमिनी इनामादाखल देऊन त्याबद्दल त्यांच्या पासून रस्ते संभाळण्याचा व त्यांच्या हद्दीत कांहीं माल चोरीस गेल्यास त्याचा पत्ता लावून देण्याचा करार करून घेतला. या रानटी लोकांस अशा चांगल्या मार्गास लाविल्यामुळे त्यांस पुढे निर्भयपणे जे कुटुंब सुख भोगावयास मिळाले त्याबद्दल त्यांनी बाईसाहेबांचे अत्यंत उपकार मानिले. असे झाले तरी त्यांच्यांत मनरूपसिंग वगैरे कित्येक अत्यंत दुष्ट लोक होते ते काही केल्या लोकांस लुटण्याचा व प्रसंग पडल्यास त्यांचा प्राणनाशही करण्याचा आपला पूर्वीचा क्रम सोडीनात तेव्हां शेकडों निरपराधी लोकांचे जीव वांचविण्याकरितां निर्दयपणा करून त्यांस देहांत शिक्षा देणे त्यांना भाग पडले. त्या रानटी लोकांपासून प्रजेला होणारा त्रास नाहीसा करणे हे जसे आपले कर्तव्यकर्म आहे; तसेंच आपल्या प्रजेची गाऱ्हाणी ऐकून न्याय देणे हेही आहे असे बाईसाहेबांस वाटले; ह्मणून गांवोगांव न्याय देणारे पंचाधिकारी नेमून त्याकडून लोकांच्या अर्जाचा व फिर्यादींचा योग्य व लवकर निकाल लागेल अशी त्यांणी व्यवस्था केली होती, व राजधानीच्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश नेमून त्यास त्यांच्या निकालांत अन्याय न होऊ देण्याविषयी खबरदारी ठेवण्याची सक्त ताकीद दिली होती. इतके असतांही जर कोणाची इच्छा स्वतः त्यांच्याकडेच फिर्याद करण्याची असली तर त्यास तसे करण्यास मुळीच हरकत होत नसे. त्या फिर्यादीची चौकशी त्या जातीने करीत असत, व ती किती जरी क्षुल्लक असली तरी तिजकडे दुर्लक्ष्य करीत नसत.

 याशिवाय कधी कोणाच्या अपराधाची चौकशी करण्या-