पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यकाभार.

[१११ ]


वरचेवर बदलले जात नाहीत ते राज्य चांगले अशी त्या कालीं आपल्या राजेरजवाड्यांची समजूत होती, व म्हणूनच ते कोणास एकाद्या अधिकारावर नेमावयाचे झाले ह्मणजे त्याविषयी फार विचार करून मग त्याला नेमीत असत. अहल्याबाईसाहेबांचीही तशीच समजूत असल्यामुळे त्यांनी आपल्या महालानिहाय जे कामगार नेमिले त्यांना प्रथम चांगले कसोटीस लावून मग नेमिले; यामुळे असे झाले की, त्या कामगारांपैकी बहुतेक अखेरपर्यंत कायम राहिले.

 आपल्या राज्याची अंतर्व्यवस्था सुधारणे व प्रजेस न्याय मिळण्याविषयी तजवीज करणे ही दोन्ही कामे करण्याविषयी बाईसाहेबांनी पुष्कळ श्रम घेतले. होळकरांच्या राज्यांत डोंगरांत राहणारे भिल्ल व गोंडलोक पुष्कळ असून ते लुटालुटी करून आपला निर्वाह करीत असल्यामुळे त्यांपासून लोकांस पुष्कळ ताप सोसावा लागत असे. त्यांचा बंदोबस्त ठिकठिकाणी नाकी बसवून त्यांनी केला. हा करते वेळी त्या रानटी लोकांकडून त्यांस अनेक वेळां हरकती झाल्या, तरी त्यांस न जुमानितां त्यांनी त्यांची खोड मोडिली; तथापि त्यांस शिक्षा वगैरे न देतां दया व सामोपचार यांची योजना करून जें शरण आले त्यांस लुटालूट करून निर्वाह करण्यापेक्षां दुसरे चांगले धंदे करण्याविषयी ताकीद दिली व त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीचा विचार करून डोंगरांतून जो माल जात येत असे त्यावर अगदी थोडा कर घेण्याविषयी त्यांस परवानगी दिली. या करास भीलकवडी असें ह्मणत व तो मालाने लादलेल्या प्रत्येक बैलामागे सुमारे अर्धा पैसा इतका