पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ११ वा.
राज्यकारभार.

 मुंबईचे माजी गव्हरनर सर जान मालकम साहेब हे माळव्यांत असतांना त्यांच्या कानावर आमच्या चरित्रनायिकेच्या निर्दोष राज्यकारभाराची कीर्ति नित्यशः येत असे. त्या वेळी तत्पूर्वी अखिल भूमंडलावर जे थोर आणि प्रजापालनदक्ष भूपति होऊन गेले, त्यांच्याही राज्यरीतींत जी सुव्यवस्था आढळावयाची नाहीं ती तिच्या राज्यांत असलेली माळव्यांतील लोकांच्या तोंडून ऐकून तीत सत्यापेक्षा असत्याचा भाग अधिक असावा असा त्यांस संशय आला. मग त्या दीवोंद्योगी व चौकस साहेबांनी तिच्या राज्यकारभारसंबंधाने अनेक प्रकारचे पुरावे गोळा करून विचार केल्यावर त्यांचा तो सर्व संशय खोटा ठरून आपण ऐकिल्यापेक्षाही त्या अलौकिक स्त्रीची तिच्या न्यायी राज्यपद्धतीसंबंधाने अधिक कीर्ति व्हावयास पाहिजे अशी त्यांची खातरी झाली, व मोठ्या संतोषाने आपल्या देशबांधवांस ती माहित होण्याकरितां स्वतः लिहिलेला 'मध्यहिंदुस्थानचा इतिहास' या पुस्तकांत त्यांणी ती लिहून दाखल केली. अंगीं योग्य सद्गुण असले म्हणजे कोणाचाही स्वकीयांकडून गौरव होतो हे ठीकच आहे; पण तो परकीयांकडून होण्यास पूर्वपुण्याईचें सहाय असावे लागते व तें या

        १०