पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमाबाई-तीर्थयात्रा.

[१०५]


  महेश्वरास असतां ज्या बाईच्या हातून नित्य हजारों रुपये दानधर्म होत असे तिच्या हातून क्षेत्रांच्या ठायीं किती झाला असेल तो एकाद्या विविक्षत संख्येने दाखविण्याचे आह्मी धाडस करीत नाही. ब्राह्मणभोजनें, देवांच्या महापूजा वगैरे तीर्थीच्या ठायी आवश्यक करावी लागणारी दानकर्मे, तीर्थयात्रा करणारे सर्व श्रीमान् अथवा गरीब लोक आपआपल्या ऐपतीप्रमाणे करितातच; तरी त्या योगाने होणारी त्यांची कीर्ति अल्पकाल राहून मागून नष्ट होते; ह्मणूनच की काय, या पुण्यवान् स्त्रीचें नांव चिरकाल राखण्यासाठी परमेश्वराने तिच्या हातून मोठमोठी सत्कृत्ये करविली. या हिंदुस्थानांत जगन्नाथापासून तहत द्वारकेपर्यंत पूर्वपश्चिम व हिमालयाच्या शिखरावर बर्फात गढून गेलेल्या केदारनाथापासून तो समुद्रांत असलेल्या रामेश्वरापर्यंत दक्षिणोत्तर जी जी ह्मणून आपली पुण्यस्थाने आहेत त्या त्या ठिकाणी या महासाध्वीने करून ठेविलेली आपली चिरकालिक स्मारकें तिच्या परोपकाराची व थोरपणाची अद्याप साक्ष देत आहेत. कांहीं देवस्थानांची जीर्ण झालेली मंदिरे तिने दुरुस्त केलेली आहेत; कांहींची नवीन बांधिली आहेत; काही ठिकाणी देवस्थानांस इनामें करून दिलेली आहेत, व काही ठिकाणी देवांस नित्य गंगोदक मिळेल अशी व्यवस्था केली आहे; तसेंच गरीब लोकाकरितां कोठे अन्नछत्रे, व कोठे पाणपोया घालून कोठे धर्मशाळा, तळी, विहिरी बांधिल्या आहेत, व त्या सर्वांची निरंतरची व्यवस्था सुरळितपणे चालविण्याकरितां तिने आपल्या राज्यांतले कांहीं परगणे निराळे काढून ठेवून त्यांचे वार्षिक उत्पन्न त्यांस मिळत जाईल अशी तजवीज केलेली आहे व तदनुसार आज पर्यंत ती चालली आहे.