पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०४]
भाग दहावा.


त्याची सविस्तर हकीगत वाचल्यापासून क्षेत्राचे पवित्र माहात्म्य ऐकण्यापेक्षां तेथील नैसर्गिक सृष्टिसौंदर्याचंच वर्णन वाचण्याकडे आपल्या चित्ताची विशेष प्रवृत्ति ठेवणाऱ्या वाचकांचे मनोरंजन होईल किंवा नाही याची आम्हांस जबरदस्त शंका येत असल्यामुळे आम्ही ती येथे देण्याच्या भरीस पडत नाही. मात्र इतकेंच सांगतों की, शेसवाशे वर्षांपूर्वी तीर्थयात्रा करण्याकरितां अनुलंध्य आणि परम भयंकर अशा पर्वतांच्या कड्यावरून व ज्यांत गगनचुंबित वृक्ष व हिंस्र प्राणी अतिशय आहेत अशा निबिड महारण्यांतून जिवाची आशा सोडून केवळ परमेश्वरावर हवाला ठेवून जावे लागे; त्यावेळी पादचारी यात्रेक-यांस प्रवास करतानां जो ताप सहन करावा लागत असे त्याची कल्पना अपणासारख्या सांप्रतकाळी आगगाडीतून सुखाने प्रवास करणाऱ्यांस होणे नाही. तथापि आमच्या चरित्रनायिकेने तत्संबंधी सर्व दुःखें सोसून आळंदी, देहु, पंढरपुर, कोल्हापुर, गिरि, रामेश्वर वगैरे दक्षिणेतील सर्व तीर्थे; पश्चिमेकडील, डाकूर, द्वारका वगैरे परमेश्वराची निवासस्थाने, तशीच पूर्वेकडील गया, काशी, प्रयाग इत्यादि पुण्यभूमि आणि अयोध्या, मथुरा, वृंदावन, गंगोत्री, बदरीकेदार वगैरे उत्तरेकडील पवित्र क्षेत्रे ह्या सर्वांचे दर्शन घेतले; आणि याशिवाय, गंगा, यमुना, नर्मदा, तापी, कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा इत्यादि महानद्यांच्या पापनाशक जलांनी स्नाने करून आपल्या देहाचे सार्थक्य केले. ज्या ज्या क्षेत्री तिचे जाणे झाले त्यांची माहात्म्ये तेथील लोकांकडून तिने श्रवण केली, आणि त्यांत सांगितल्याप्रमाणे देहदंड करून घेऊन आपली तीर्थयात्रा परिपूर्ण केली.