पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमाबाई-तीर्थयात्रा.

[१०३]


ण्याची जर इच्छाच असेल तर या चरित्रांतील पुढील एका भागांत ती तृप्त करण्याविषयी आम्ही वचन देतो.

 माधवराव व रमाबाई यांच्या अकालिक मृत्युमुळे त्यांच्या प्रजेस व सर्व सरदारांस जें अत्यंत दुःख झालें तें वर्णन करून दाखविता येत नाही. त्या भयंकर प्रसंगाने आमच्या चरित्रनायिकेच्या अंतःकरणास मोठा चटका लागून गेला. परमोदार व शूर अशा आपल्या धन्यावर दुष्ट कालाने एकाएकी धाड बातल्यामुळे व त्याच्याबरोबर अल्पवयस्क असून अनेक सगुणांची जी केवळ खाण, व जिने आपल्यावर मातेप्रमाणे प्रेम ठेविलें, त्या आपल्या धनिणीने सहगमन केल्यामुळे स्वतःवर आलेल्या पूर्वीच्या प्रसंगाची तिला आठवण झाली व ऐहिक स्थितीचा तिटकारा येऊन ती अगदी विरक्त झाली, आणि त्यामुळे, सर्व राजेरजवाडे पुण्यांतून निघून गेल्यावर तिने आपल्या राजधानीस परत न जातां तीर्थयात्रा करण्याचा निश्चय केला.

 नंतर सर्वांचा निरोप घेऊन साध्वी अहल्याबाई पुण्यापासून जवळच जेजुरी येथे जे होळकरांचे कुलदैवत आहे त्या खंडोबाच्या दर्शनास गेली व आपल्या कुलस्वामीसंनिध काही दिवस वास केल्यावर पुढे तीर्थयात्रेकरितां बेताचीच मंडळी जवळ ठेवून बाकीच्या लोकांस तिने परत महेश्वरास पाठविलें, व क्रमाने प्रथम दक्षिणेकडून सर्व तीर्थे करीत जाण्याचा विचार केला.

 आमच्या चरित्रनायिकेच्या एकंदर आयुष्यक्रमांत तिने केलेल्या तीर्थयात्रेचा भाग अत्यंत महत्वाचा व पुण्यकारक आहे. तथापि