पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४]
भाग पहिला.


पुत्र झाला व त्याचे नांव मल्हारी ठेविलें.

 मल्हारी लहान असतांनाच त्याचा बाप निवर्तला; तेव्हां उदरनिर्वाहाची पंचाईत पडू लागली; ह्मणून त्याची आई त्यासह खानदेशांत तळोदेंगावी तिचा भाऊ रहात होता त्याच्या घरी येऊन राहिली. त्याची कांहीं जमीन व थोडीशी गुरेढोरें होती त्यांवर त्याचा चरितार्थ चालत असे. त्याने आपल्या भगिनीवर आलेला आपत्काल जाणून तिला आश्रय दिला. मल्हारीचे वयास आठवें वर्ष लागल्यापासून तो आपल्या मामाची मेंढरें रानांत चारावयास नेत असे. त्या वेळची अशी एक गोष्ट सांगतात की, मल्हारी रानांत मेंढरे चरत असतां विश्रांतीसाठी एकाद्या झाडाच्या छायेंत झोंप घेत पडे त्या वेळी तेथे एक मोठा नाग येऊन तो त्याच्या मस्तकावर आपली फणा धरीत असे. हे त्याची जी पुढे लवकरच दैवोन्नति झाली तिचं पूर्वचिन्ह होते.
 मल्हारी हा जरी आपले मामाचे घरीं गुरं राखीत होता तरी तो लहानपणापासूनच मोठा साहसी, शूर, जिवास जीव देणारा व धन्याची आज्ञा प्राणापलीकडेही पाळणारा असा दिसे. त्याचे हे स्वाभाविक गुण त्याच्या मामाच्या लक्षात आल्यावरून त्याने त्यास मेंढ्या राखावयाचे काम योग्य नाहीं असें जाणून त्या वेळी कंठाजी कदम बांडे ह्मणून कोणी सरदार सेनापति दाभाडे यांचे अंकित असून खानदेशांत रहात होते त्यांच्या येथे त्यास बारगिराची एक लहानशी जागा देवविली; आणि तेव्हापासून मल्हारी, मेंढ्या राखण्याचे काम सुटून, ज्यांत त्याने पुढे चिरकालिक नांव मिळविले त्या युद्धशाळेच्या प्रथम वर्गात तो पाठ-