पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमाबाई–तीर्थयात्रा.

[१०१ ]


परमेश्वराने आपल्यावर आणिलेला भयंकर प्रसंग व तो खरोखर घडून आल्यास पतिव्रताधर्माप्रमाणे सती जाण्याचा आपला झालेला निश्चय इत्यादि सर्व गोष्टी निष्कपटपणाने सांगितल्या व त्या ऐकून अहल्याबाईस अत्यंत दुःख झाले. तथापि ती अनेक प्रकारच्या दुःखांतून पोळून निघाली असल्यामुळे तिने वारंवार धैर्य देऊन त्या घाबरलेल्या साध्वीचे सांत्वन केले.

 या वेळी आमच्या चरित्रनायिकेचा मुक्काम बरेच दिवस पुण्यास झाला होता. तितक्या अवकाशांत तिच्या सगुणांची कीर्ति पुणे शहरच्या ज्या स्त्रीपुरुषांच्या कानांवर गेली त्या सर्वांनी राजवाड्यांत जाऊन तिची भेट घेतली. त्या वेळी चमत्कार असा झाला की, एकाद्या साधूच्या किंवा तीर्थाच्या दर्शनाने जसा चित्तास आनंद होतो त्याप्रमाणे त्या महासाध्वीच्या दर्शनाने सर्वीस झाला असे स्पष्ट दिसून आले. खऱ्या सद्वर्तनाच्या मनुष्याची योग्यताच अशी आहे की, तिच्या योगाने इहलोकी सर्वांच्या मनांत त्या मनुष्याविषयी पुज्यबुद्धि वास करिते आणि परलोकी त्याला चिरकालिक सुख प्राप्त होते.

 तथापि, या सद्गुणांचा हेवा करणारी विधात्याची विलक्षण सृष्टि जगांत दृष्टीस पडत नाही असे नाही. ज्या साध्वी अहल्याबाईच्या कीर्तश्रवणाने व प्रत्यक्ष दर्शनाने सकल पुण्यपतनस्थांची मने प्रफुल्लित झाली तिच्या लोकोत्तर सद्गुणांच्या उत्कर्षाने आपल्या सर्वांगाची आग करून घेणारी एक सुंदर पण दुष्ट स्वभावाची स्त्री खुद्द पेशव्यांच्याच घराण्यांत येउन राहिली होती; ही कलिकृत्या आनंदीबाई होय, हे आह्मी