पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १००]
भाग दहावा.


आणि अभिमान त्यांच्या मनांत उप्तन्न होत असे. मानवी स्वभावाविषयी त्यांत विशेषेकरून स्त्रीस्वभावाविषयी विचार केला तर असे आढळते की, समान गुणाविषयी एकीचा होणारा उत्कर्ष दुसरीस कधीही सहन होत नसतो; असे असतां रमाबाई व अहल्याबाई यांच्या मनांत एकमेकींविषयी मत्सराचा लेशही कधी न शिरतां केवळ मायलेकीप्रमाणे प्रेमभाव उप्तन्न होऊन तो आमरण कायम राहिला ही मोठीच विलक्षण गोष्ट म्हटली पाहिजे व तिजकरितां या दोन्ही सद्गुणी व महाराष्ट्र देशाच्या इतिहासास भूषणास्पद झालेल्या स्त्रीरत्नांची जितकी स्तुति करावी तितकी थोडीच. असो.

 इसवीसन १७७२ या वर्षी केवळ अल्पवयस्क असतांही ज्यानी नीतीने प्रजापालन केले व आपल्या शौर्याने मोठमोठ्या शत्रूस रणांगणीं दांती तृण धरावयास लावून सर्वांकडून आपणांस शाबास ह्मणवून घेतले, त्या माधवरावांस जबर दुखण्याने गांठिले. पुष्कळ औषधोपचार झाले तरी त्यांच्या प्रकृतीस किंचितही आराम न पडतां दिवसेंदिवस ती अधिकच बिघडत चालल्यामुळे त्या दुखण्यांत त्यांचा परिणाम झाल्यावांचून राहात नाही, अशी सर्वांची खातरी झाली. त्या वेळी श्रीमंतांच्या समाचाराकरितां त्यांच्या पदरचे सर्व संस्थानिक व जहागीरदार पुण्यास गेले होते, त्यांत आमची चरित्रनायिकाही तेथे गेली. नंतर तिची व रमाबाई यांची भेट झाली असतां दोघींच्याही हृदयांत भडभडून आले. आपल्या या मानिलेल्या मातेजवळ रमाबाईन, त्या वेळी आपल्या घरांत लागलेला कलह, तसाच चुलतसासू आनंदीबाई इनें आपल्याशी धरिलेला दावा, आणि अशा वेळी