पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग१० वा.


रमाबाई-तीर्थयात्रा


 श्रीमंत दादासाहेब पेशवे यांनी आमच्या चरित्रनायिकेवर जो भयंकर प्रसंग आणिला होता त्यांतून आपली मुक्तता करून घेण्याकरितां तिने आपली धनीण श्रीमंत माधवरावांची स्त्री रमाबाई इला पत्र पाठविले होते व त्या दया अंतःकरणाच्या राजपत्नीने तिच्या इच्छेनुरूप त्या संकटांतून तिची सुटका केली इत्यादि सर्व गोष्टी मागें सांगण्यांत आल्याच आहेत. त्या वेळेपासून आमची चरित्रनायिका व रमाबाई या दोघींच्या अंतःकरणांत परस्पराविषयी अत्यंत प्रेम उप्तन्न झाले होते व तें इतके वाढले होते की, रमाबाई अहल्याबाईला केवळ आपल्या आईप्रमाणे मानीत असे व अहल्याबाईही तिजवर आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे लोभ करीत असे. या मानिलेल्या मायलेकींची दरमहाच्या दरमहा परस्परांस मोठ्या कळकळीची पत्रे येत जात असत व त्यांबरोबर प्रेमाची भेट ह्मणून अनेक प्रकारची फळे, उंची उंची वस्त्रे व कधी कधी मौल्यवान् अलंकारही पाठविले जात. दोघींच्या ठायीं पातिव्रत्य, औदार्य व प्रजावात्सल्य इत्यादि अमूल्य सद्गुणांचा वास असल्यामुळे त्यांची सर्वत्र कीर्ति करणारी अशी नित्य नवी गोष्ट उभयतांना कळत असे; व त्या योगाने परस्परांविषयी आनंद