पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९८]
भाग नववा.


कारण, साध्वी अहल्याबाईस तिच्या अंगांतील अपरिमित औदार्यामुळे व इतर सद्गुणामुळे सर्व हिंदुस्थान वाखाणीत होते; अशा वेळी तिच्या द्रव्याचा अथवा अधिकाराचा अपहार करण्याचे किंचितही मनांत आणून त्याने तिजशी भांडण केले असते, तर सर्व लोक या त्याच्या पापकृत्याबद्दल त्यास शिव्या व शाप दिल्यावांचून कधी स्वस्थ बसले नसते, व तिच्या मनाविरुद्ध त्यास होळकराच्या गादीचा उपभोग घेणेही कठीण झाले असते; पण तो विचारी व दूरदृष्टि असल्यामुळे त्याने आपल्या महत्वाकांक्षेचा रोख त्या साध्वीचे प्रिय करून तिचे आशीर्वाद मिळण्याकडेसच धरिला व तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिजशी एकनिष्ठ सेवक या नात्याने वागून त्याने तिजकडून आपले व आपल्या वंशजांचे कल्याण करून घेतले, व त्या साध्वीचे वचन पाळल्याने इहलोकी चांगले नांव व परलोकी पुण्य संपादन केले. आपल्यावर उपकार करणाऱ्या स्त्रीविषयीं निरंतर कृतज्ञ असणारा तुकोजीसारखा मनुष्य शेकडों देशांचे इतिहास चाळून पाहिले असता त्यांत एकादा तरी सांपडेल की नाही याची वानवाच आहे, असे स्वामिनिष्ठ सेवक ज्या राज्यांत असतात त्याची भरभराट लवकर होते यांत नवल कसले ? साध्वी अहल्याबाईच्या सद्वर्तनाने आणि औदार्याने होळकरांच्या घराण्यास जितकें भूषण आले आहे तितकेंच तुकोजीरावाच्या स्वामिभक्तीने आणि राज्यरीतीनें प्राप्त झाले आहे असे आमच्याने मटल्यावांचून राहावत नाही.

भाग नववा समाप्त.