पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अहल्याबाई आणि तुकोजी होळकर.

[९७]


युद्ध करण्याची तयारी केली. मग बरेच दिवस दोघांची लढाई चालून तींत होळकरांकडील बरेंच सैन्य जायां होऊन खर्चास शिल्लक नाहींशी झाली; तेव्हां तुकोजीने हा आलेला प्रसंग महेश्वरी अहल्याबाईस पत्र पाठवून कळविला, व सैन्याची आणि खर्चाची मदत करावी, नाही तर तह करून लढाई मिटवितों असेंही लिहिले. तुकोजीच्या या कृतीने बाईस अत्यंत राग येऊन तिने त्यास उत्तर पाठविलें तें असें--'तुकोजी होळकर मेला तरी चिंता नाही; पण पदरच्याकडून असा बदनक्षा करून घेऊ नये. हिंमत न सोडतां त्याचे पारिपत्य करावें. मी इकडून सैन्याचा व पैशाचा पुरवठा करिते. म्हातारा झालास ह्मणून लढाईची जरब खाल्ली असल्यास मी स्वतः सैन्य घेऊन येऊन त्याचे पारिपत्य करिते.' असे लिहून त्याचा मुलगा काशीराव यास बरोबर पांच लक्ष रुपये व सैन्याची टोळी देऊन रवाना केले. अहल्याबाईचं हे पत्र पोंचतांच तिने दिलेल्या दपटशहाचा त्यास धाक पडून तो पुनः उत्साह धरून शत्रूशी लढाई करूं लागला व तीत पराक्रमानें ह्मणा अथवा बाईच्या पुण्याने ह्मणा त्याने यश संपादिले.

 आतां वर जी इतकी हकीकत दिली तीवरून अहल्याबाई व तुकोजीराव या दोघांनी परस्परांविषयी आपली आचरणें कशी ठेवून आपल्या हयातीत होळकरांची राजसत्ता सर्व प्रजेस सुखावह केली हे कळून येईल. तीस वर्षांत त्या उभयतांमध्ये एक दिवस देखील कोणत्याही बाबतीत भांडण झालेले कधी कोणाच्या पाहण्यांत किंवा ऐकण्यांत आले नाही, व याबद्दल तुकोजीहोळकराची जितकी स्तुति करावी तितकी थोडीच आहे.