पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ९६]
भाग नववा.


नाही. याशिवाय होळकरांची कोट्यावधि रुपयांची तिजोरी बाईच्याच स्वाधीन होती व तिचा ती आपल्या मनाप्रमाणे व्यय करीत असे. तरी त्या संबंधाने त्याने तोंडांतून कधी चकार शब्द देखील काढिला नाही.

 अहल्याबाईच्या वचनाची जरब तुकोजीला किती होती याविषयीं एक दोन गोष्टी आहेत त्यांवरून ती चांगली लक्षांत येईल. इंदूर शहरांतला देवीचंद नांवाचा कोणी सावकार मरण पावला त्या वेळी तुकोजीच्या सैन्याचा तळ इंदूरशहराजवळ पडला असून अहल्याबाई महेश्वरी होती. त्या सावकारास संतान नव्हते, तेव्हां कित्येक मतलबी पुरुषांच्या फुसलावणीवरून त्याच्या द्रव्याचा काही भाग प्राप्त व्हावा असें तुकोजीनें मनांत आणिलें व त्याप्रमाणे त्या सावकाराच्या स्त्रियेस सांगून पाठविले. त्या सावकाराची बायको ताबडतोब महेश्वरी गेली व अहल्याबाईस सर्व हकीकत निवेदन करून माझें रक्षण करा असें ह्मणाली. बाईने तिची सर्व हकीकत ऐकून घेतली व ती आपल्या नवऱ्याच्या मालमत्तेची योग्य मालकीण आहे असें ठरवून लागलाच तुकोजीस हुकूम लिहिला की, माझ्या शहरांतील लोकांस तुह्मी बिलकूल त्रास देऊ नये व तुम्ही आपली छावणी इंदुरापासून दूर न्यावी. अहल्याबाईचा असा निरोप येतांच तुकोजीने केलेल्या अपराधाची क्षमा मागून आपली छावणी दूर नेली.

 राजपुतान्यांतील एका मांडलिक संस्थानिकाकडे तुकोजी खंडणी मागावयास गेला असता त्याने ती न देतां त्याशी