पान:अस्पृश्य -विचार.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५५ )

स्वाभिमान शिकविलाच पाहिजे. पुष्कळ गांव-पुढाऱ्यांच्या पुढे या विषयाचा पाढा वाचला म्हणजे ते उद्गारतात, ' खरे आहे, पण समाज तयार नाही.' समाजाच्या बिनतयारीवर सगळा डाव कोलवून देणे मोठे सोयीचे असते. पण त्यांनी इतकेंच ध्यानात घ्यावे की, हा मुद्दा राजकीय चळवळीच्या वेळी आपण पुढे आणतों का, आणि एखाद्याने आणला तर त्याची संभावना आपण कशी काय करतो? तयारी नाही असा वहीम असला तर आपण तयारीच्या मागे लागतो. तसेंच येथे. आपल्याला ' खरे आहे ' असे वाटत असल्यास समाजाला ती शिकवण सुरू करावी. नाही तर समाजाने म्हणावें, पुढारी बोलत नाहीत आणि पुढाऱ्यांनी म्हणावें, समाज तयार नाही. म्हणजे या चक्रांतून सुटावयासच नको. कोणी म्हणतात 'हे लोक मोठे घाणेरडे असतात. जवळ कसे करावेत ?' येथेहि वरचेच चक्र लागू आहे. दूर ठेवले म्हणून घाणेरे का घाणेरे म्हणून दूर ठेवलें ? जरा चार माणसांत घ्या आणि मग बघा तसेच घाणेरडे राहतात का? ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे की, त्यांच्यांतील प्रतिष्ठित माणसें चांगल्या संगतीत खात्रीने अधिक स्वच्छ होतात. कोणाची अशी तक्रार आहे की, हे लोक, म्हणजे त्यांच्यांतले बोलके, भारी शिव्या देतात. होय, हे खरे आहे. पण असें ध्यानांत व्यावयास पाहिजे की, त्यांच्या स्थितीत आपण असतो तर कसे काय केलें असतें? चाकावर बांधले जाऊन फटके बसत असलेल्या एका कैद्याचे किंचाळणे ऐकून शेजारी उभे राहिलेले एक सतारमास्तर म्हणाले, ' बाबा, तुझे हाल कबूल आहेत. पण तुझे किंचाळणे मोठे कर्कश लागते ' तसाच हा प्रकार आहे. असे वाटते की, हालांतून काढण्याच्या कामाला आपण लागलो तर त्यांच्या शिव्या बंद होतील, कारण त्यांना तितपत कळते, निदान कळावे. असो. कोणा तात्विकांचा युक्तिवाद असा आहे की, यांना राष्ट्रीय चळ-