पान:अस्पृश्य -विचार.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२ )

जेथपर्यंत येऊ शकतो तेथपर्यंतहि अस्पृश्य येऊ शकत नाही, असे म्हटले म्हणजे राज्यकर्ते विष्णूचेच अवतार असतात असे म्हणावयाचे. पुजारी जेव्हां एकाद्या साहेबाला ही मूर्ति अशी आहे आणि ती तशी आहे असे माना हालवून सांगावयास लागतो तेव्हां त्याला या उत्तराशिवाय दुसरें न सुचणेच रास्त आहे. पण हे असले लोक आपलें दास्य लपविण्यासाठी तत्त्वज्ञानाची फरपट काढतात आणि दास्य चिरंतन करतात येवढाच या उत्तराचा अर्थ आहे. जो कोणी मानगुटीस बसेल तो विष्णू अवतार ! असली उत्तरे मिळतात म्हणून त्यांचा उल्लेख करावासा वाटतो इतकेंच, बाकी त्याची किंमत काय आहे हे कोणालाहि कळण्यासारखे आहे.
 असो; याप्रमाणे राजकारण, समाजकारण, आणि धर्मकारण या तिन्ही ठिकाणी अस्पृश्याच्या काय काय तक्रारी आहेत त्या आतांपर्यंत दिग्दर्शनरूप थोडयांत मांडिल्या आहेत. राजकारणांत दशाभिमानाला सबळ कारण नाही, समाजकारणांत खडखडीत बहिष्कार असून सुखाची वाटणी नाही आणि धर्मकारणांत त्याच बहिष्काराची परमावधि असून ज्ञान व शांति यांचा लाभ नाही. अशी ही तक्रार थोडक्यांत आहे. आतां हिंदुसमाजातर्फे काय म्हणतां येण्यासारखें आहे, महाराची दृष्टि कशी असावयास पाहिजे या संबंधी काय म्हणतां येते तें पाहू.
 सध्या पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे लोक इतर वर्णीयांच्या बाबतींत जसा आचार करीत आहेत तशाच प्रकारचा आचार त्रैवर्णिक आर्यांनी फार पुरातन काळी मूळ एतद्देशीयलोकांच्या बाबतीत केला. सुपीक प्रदेश आपल्या ताब्यांत घ्यावेत, हरतऱ्हेच्या संपत्ति तेथें उत्पन्न कराव्या, आपण भोगाव्या व थोडा वाईटपणा पदरी आला तरी तो पतकरून आपल्या पुढील प्रजांच्या उपभोगासाठी मोठ्या दक्षतेने त्या जपून ठेवाव्या, अन्य वर्णीयांशी