पान:अस्पृश्य -विचार.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )

असो; अशा प्रकारे धर्मापासून फलित होणाऱ्या सर्व हितापासून अस्पृश्य कायमचाच दुरावलेला राहिला आहे. अर्थात् कशाप्रकारच्या पूजाअर्चेकडे त्याचे मन वळलें असेल आणि मनुष्याला सहज अशी जी धर्मबुद्धि तिला कसला व्यवसाय त्याने प्राप्त करून दिला असेल हे सहज अनुमानितां येण्यासारखे आहे. त्याचे देव म्हणजे मरीआई, जाखाई, जोखाई, तुकाई, म्हसोबा, बिरोबा फार झाले तर खंडोबा, ढेगू, मेगू अशासारखी अक्राळविक्राळ, भेसूर, शेंदूर माखलेली, कोंबडी मागणारी, शिरा ताणल्याने अंगांत येणारी, वेताळाच्या प्रकृतीची आणि झुटिंगाच्या हट्टाची मंडळी आहेत. यांची पूजा म्हणजे पूज्य वस्तूच्या थोर गुणाबद्दल वाटणाऱ्या आदराचे प्रदर्शन नव्हे, तर भेडसावणाऱ्या सावल्यांना लांच चारण्याचा प्रयत्न आहे. तिने अस्पृश्याच्या जिवाला शांति आणि आनंद लाभत नाहीत तर नाकेदाराला जकात दिल्यासारखे वाटते इतकेंच. संसाराच्या व्यापांतून बाहेर ओढून काढून त्याचे मन आपल्या गोड आणि मऊ वेष्टनात, काही वेळ का होईना, पण अडकवून ठेवील असें उदात्त तत्त्व या पूजेत नाही. थोर विभूतीच्या गुणोत्कर्षाचा, गोलाने चढत जाणाऱ्या पायऱ्यांचा, म्हणजे ध्येय दाखविणारा आणि वाटाड्याचेंहि काम करणारा, सुंदर मनोरा या पूजेत अस्पृश्याला दिसत नाही. आणि सर्वांच्याहि वर, चारापाणी मिळविण्याच्या खटपटीत असतांना आणि भिन्न भिन्न प्रवृत्तींच्या माणसांशी प्रसंग आले असतांना, झोक जाऊन जी पातकें आपल्या हातून घडतात त्यांच्या रुखरुखीने पोखरलेले आणि मरणाच्या दटावणीने घाबरलेलें आपलें मन, ' मामेकं शरणं व्रज म्हणजे मी तुझा त्राता बनेन ' या परमेश्वरी आश्वासनाने निर्धास्त होऊन जसें विसावा पावतें, तसा काहीहि प्रकार मरीआईच्या पूजनांत अस्पृश्याला होत नाही. पेंढार येणार म्हणून आवई उठली म्हणजे जसा दाणागोटा गोळा करून त्याच्या तोंडा-