Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २५ )

अशी शिकवण तो त्याला देतो; आणि त्याचा जीव दारिद्याद्र्याने ओशाळला किंवा अवमानाने चिडून गेला तर जवळ जाऊन त्याला गोंजारून आणि धीर देऊन नित्य नवीन उगवणारी 'उद्यां' आजच्यापेक्षा खरोखरच जास्त आनंदाची येईल असा विश्वास त्याच्या ठिकाणी उत्पन्न करतो. पण धर्माची ही सगळी कर्तबगारी अस्पृश्यांच्या बाबतींत शून्यच असते. 'समाजव्यवस्था, समाजव्यवस्था' म्हणजे त्रैवर्णिकांच्या सुखसोयींची दक्षता ती राहावी म्हणून ज्या गुणांच्या बळावर इहलोकोंची यात्रा त्याला अधिक सुखाची करतां आली असती त्या गुणांच्या प्रसराला अवसर न देणे हाच धर्म झाला आहे. पूर्वसंचितानेच तूं 'नीच' योनीत जन्माला आला आहेस असे त्याला सांगून धर्म त्याच्या मनोबलाची अर्धीअधिक हत्त्या करतो आणि सद्विचार, सदाचार, ज्ञान इत्यादींच्या सान्निध्यापासून त्याला दूर ठेवतो. अर्थात् तो अनीति, अमंगल विचार, दुष्ट वासना आणि मलिन वाणी अशा कर्दमांत वाढतो. मरणोत्तरकालाविषयी बेफिकीर होऊन इहलोकच्या आचारांत बेफाम बनतो. त्याने धर्म ऐकावा कोठे आणि शिकावा कोठे? ज्या मंदिरांत धर्मावर प्रवचनें चालावयाची, प्राचीन थोर विभूतींच्या सुरस आणि उत्साहवर्धक कथा ऐकावयास सांपडावयाच्या, आणि साधुसंतांच्या प्रेमळ वाणीचा रंग लुटावयास मिळावयाचा, त्या मंदिरापासून त्याला मोठ्या अदबीने आणि भयाने दूर सरावे लागते. आश्रमव्यवस्थेत त्रैवर्णिकांना संस्कारयुक्त जीवित लाभते आणि त्यांच्या पारमार्थिक कल्याणाची काळजी वाहिली जाते. अस्पृश्याला दोनहि गोष्टींना मुकावे लागते. साधुसंतांनी धर्म त्याच्या घरीदारी पोचविला असला तर ती गोष्ट आश्रमव्यवस्थेनें गौरवासाठी आपल्याकडे ओढून घ्यावी. पण तिने ती योजना बुद्धिपुरस्पर केली असे कधीही म्हणता येणार नाही.