पान:अस्पृश्य -विचार.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २१ )

करतो त्याप्रमाणेच त्याचाहि संसार सुखाचा व्हावा म्हणून, जी काही थोडी भाकरी आपल्या या हतभाग्य देशांत शिल्लक राहिली आहे तिचा हिस्सा त्याला त्याच्या योग्यतेनुरूप मिळू द्यावा हे देशबंधुत्वाच्या म्हणजे सहोदरत्वाच्या नात्याला योग्य होईल. भांडण हे आहे की, देशांतला उरलासुरला मलिदा तुम्ही त्रैवर्णिक खाता आणि अस्पृश्याला एकजात बहिष्कारामुळे संसारांत जिगजीग उत्पन्न होते. यथेंच जाता जाता हेहि सांगितले पाहिजे की, आपण त्रैवर्णिक सोयीसाठी कोणतेहि भिन्न भिन्न धंदे आचरित असलो तरी आपल्याला जन्माने मिळालेली जात गेली असे आपण मानीत नाहीं म्हणून धंद्यांत सरमिसळ झाल्याने मागोमाग जातींचाही संकर होईल असें भय जातीस जपणाऱ्या माणसांनी मुळीच बाळगू नये.
 यापुढे पुनर्जन्माविषयींहि थोडेसें अवश्य लिहिले पाहिजे. मी अस्पृश्य कां, असें महाराने विचारले तर पूर्वसुकृतानुरूप तुला ही योनि मिळाली आहे असा जबाब देण्यात येतो. आता हे पूर्वजन्मींच्या कृतीचे तत्व खरोखर अत्यंत उदात्त आहे. परंतु त्याचा उपयोग केवळ ज्या ठिकाणी व्हावयास पाहिजे त्यापेक्षा जास्त ठिकाणी केला जातो. एकाद्याने प्रयत्न केले, अंगच्या सर्व शक्ति वाढीस लाविल्या आणि त्यांच्या बळावर तो काही साध्य करूं लागला असतां जर त्याला अपयश आले, किंवा कोणी लुलाच जन्मला, घर पडून मेला , किंवा स्वतःचा कोणताहि दोष नसतां जन्मभर दुःखीच राहिला तर त्याच्या समाधानासाठी हे पूर्व - सुकृताच्या फळाचे तत्त्वज्ञान आहे. आपली शिकस्त करूनहि जर सुख पाठमोरेंच राहू लागले तर या तत्त्वज्ञानाशिवाय समाधानाला दुसरी कोणतीहि जागा नाही. परंतु जें केवळ अदृष्टाच्या अर्थशोधासाठी असावे, तें मनुष्यकृत गोष्टींच्या समर्थनार्थ उपयोगांत येऊ लागले आहे. जी गोष्ट करता आली असती किंवा टाळतां आली असती अथवा बदलतां आली असती,