पान:अस्पृश्य -विचार.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२ )

आणि तीहि आपल्या अंगच्या बळावर, ती " तुला जन्मानेच प्राप्त झाली आहे म्हणून भोग " असे सांगणे म्हणजे रोग का झाला हे कळत असतांना सुद्धा औषध न घेऊ देण्यासारखे आहे.
 इतर देशांत, अत्यंत गरीब कुळांतील माणसांना सुद्धा, नशीब काढण्यास आपल्याइतके प्रत्यवाय नाहीत. कोठे कोठे तर बिलकुलच नाहीत. ज्या गोष्टी त्यांच्या बुद्धीच्या आणि आवाक्याच्या बाहेरच्या असतील, त्या संबंधानें कोण काय करणार ? पण तोपर्यंत तरी माणसांनी आपल्या सोयीसाठी केलेल्या गोष्टी तत्त्वज्ञानाच्या नांवावर विकून अस्पृश्याला भोळा करून ठेवू नये. उद्या एकाद्या देशांतल्या लोकांनी आपल्या देशांतील काही बांधवांवर " खाली डोके वर पाय करून चालावे " अशी शिक्षा फर्मावली व असें कां म्हणून विचारतां हे तुझ्या मागील जन्मींच्या कृतीचे फळ आहे असे त्याला सांगण्यांत आले तर त्याने काय ते निमुटपणे सोसावे ? तसेंच उद्यां जर इंग्रजांनीहि आम्हांला आमच्या मागील जन्मींच्या पापकृत्यांचीच फलरुप अवस्था आमची सध्याची स्थिति आहे, आणि म्हणून ती आम्ही निमुटपणे भोगली पाहिजे, असे सांगितले तर मग ह्या कर्मभूमीतील कर्मयोगाचे रहस्य ते काय ? कर्मशूर व्हा म्हणतां काणि कर्म तर करू देत नाही यामुळे तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांची फारकत होत आहे. जन्म हा दैवायत्त राहील ; पण पौरुष मात्र ' मदायत्त ' आहे असे प्रत्येकास म्हणतां यावं.
 तसंच पृथ्वीवरील अवघे समाज कोणत्या तऱ्हेनें पुरुषार्थ साधीत आहेत हे पाहिले तर आमच्या देशांतील कोट्यवधि प्रजाजनांच्या अंगांतील शक्ति आणि भावना केवळ मातीच्या मोलाने जात आहेत, असे वाटते. त्यांचे जिणे म्हणजे शेरडीच्या शेपटासारखे झाले आहे. " लाजहि झाकीना आणि मशाहि वारीना ! " देशांत वेभव, संपत्ति, सुखें, कलाकौशल्य आणि विद्याभिवृद्धि ही प्राप्त होण्यास