पान:अस्पृश्य -विचार.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५ )

जवळ केले होते इतकेंच. प्रस्तुत प्रकरणीहि असेंच होण्याची भीति आहे. राजकारणातील तेढ लक्षात घेऊन अस्पृश्यतेसंबंधी अनुकूलता दाखविणे हे समयज्ञतेचे लक्षण असेल; पण त्यांत खोलपणा जरा कमी आहे असेच म्हणावे लागेल. ही बाब जातितः सामाजिक आहे, म्हणून सामाजिक दृष्ट्या विचार करून जे या प्रश्नासंबंधाने अनुकूल मत प्रदर्शित करतात त्यांची बुद्धि या विषयाच्या बुडाशी पोंचली असें ह्मणतां येईल. पण सामाजिक दृष्टीने याचा न्याय कबूल करून पत्करावयाचा म्हणजे आजपर्यंत मनाला चिकटून राहिलेल्या व म्हणूनच प्रिय वाटणाऱ्या समजुती व कल्पना सोडण्याचा प्रसंग प्राप्त होतो. अर्थात् ही गोष्ट जरा कठीणच आहे. म्हणून वर म्हटले आहे की, अस्पृश्यतेचा सामाजिक दृष्टीने केलेला विचार अत्यंत अप्रिय वाटण्यासारखा आहे.
 असो. अस्पृश्यतेची न्याय्यता ठरवितांना अगदी पहिली कल्पना जी सांगण्यांत येते ती ही की, अस्पृश्य लोकांची पूर्वपरंपरा कुलोत्पन्नतेच्या बाबींत असावी तितकी शुद्ध नाही. उच्च जातीत निघालेल्या कांहीं कुलटा स्त्रियांपासून प्रतिलोमपद्धतीने झालेली ही प्रजा आहे. केवळ धर्मग्रंथावर जे भूतकालीन माहितीसाठी अवलंबून राहतात त्यांचे असे मत असेल; पण इतिहासावर जे अधिक विश्वसतात त्यांची साक्ष अशी नाही. त्रैवर्णिक आर्यांनी आपल्या तेजाने दिपविलेली व मग दास्यकर्मात कायमची डांबलेली ही प्रजा आहे इतकाच त्यांचा अभिप्राय आहे. धर्मग्रंथांतील प्रतिलोम-उत्पांदनाच्या आरोपाविषयी फार झाले तर इतकेंच म्हणता येईल की, असली उरफाटी प्रजा ह्या दास्यकांत बांधलेल्या लोकांच्यासारखीच नीच समजली जात असे. पण वास्तविक पाहतां अस्पृश्यतेसंबंधानेच जेथे वाद चालू असेल तेथे हा कुलोत्पन्नतेचा प्रश्नच उद्भवू नये. अस्पृश्यांशी शरीरसंबंध घडवून आणावे की नाही असले प्रश्न ज्यांना