पान:अस्पृश्य -विचार.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६ )

उकरून काढून धोपटीत बसावयाचे असतील त्यांनी आणि त्यांच्याशी वरील उत्पत्तिवाद खुशाल करावा. आमचा मुख्य विषय अस्पृश्यता हा आहे. तेव्हां या लोकांना अस्पृश्यतेतून काढावें असें म्हणतांच जे कोणी हा उत्पत्तीचा सवाल पुढे टाकतात त्यांना इतकेंच सांगावयाचें की, हे बोलणे अप्रस्तुत आहे. आम्ही जर रक्तमिश्रणासंबंधाने चर्चा सुरू केली असती तर तुमच्या म्हणण्याचा विचार करतां आला असता.
 याच्या पुढला मुद्दा असा आहे की, हे लोक घाणेरडे धंदे करतात, गुरे फाडतात, तेव्हां त्यांना स्पर्श कसा करावा ? आतां मोऱ्या, नाले उपसणे, गुरे फाडणे इत्यादि धंदे हे लोक करतात हे इतकें खरे आहे की तें नाकबूल करतांच येत नाही. पण येथे प्रत्युत्तरादाखल इतकेच विचारावयाचे की, त्यांना काय याच गोष्टी करावयाची हौस आहे ? का दुसरें कांही त्यांना करता येण्यासारखें नाहीं ? पण तुम्ही चार माणसांत येऊ द्याल तर की नाही ? तुम्हा त्रैवर्णिकांना हे धंदे व्हावयास तर पाहिजे असतात, पण स्वतः करण्यांत मानहानि वाटते आणि हे महारामांगाचें भरताड तुम्हांला आयतेंच सामाजिक वेठीला सांपडले म्हणून ते हे धंदे करतात. त्यांना या धंद्याच्या बाहेर फिरकू देतो कोण ? आधीं नाके कापावीत, जोडावयाचा यत्न केला तर जोडू देऊ नयेत आणि मग ' तुम्ही नकटे ' म्हणून हिणवावे, ही नीति मतलबी थोरांना शोभते खरी ! आधी शस्त्रे काढून घ्यावीत, कोणी परजू लागला तर त्याचा हात कलम करावा आणि मग " तुम्ही दुबळे स्वसंरक्षण काय माती करणार " असे म्हणत राहावे, हा दुसरीकडे राज्ये करावयास सोकावलेल्या लोकांचा धडा, अस्पृश्य लोकांच्या बाबतीत त्रैवर्णिक चांगलाच गिरवीत असतात ! येथे अशी एक शास्त्रीय कोटी करण्यात येते की, " प्रत्येक समाजांत असली कामें करावयास कांहीं माणसें पाहिजेत